मुंबईः शिवसेना (Shivsena) नेते, मावळत्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महापौर पदाचा भावी चेहरा म्हणून पाहिले जाणारे यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी मिळाली असून, यातून त्यांच्या व्यवहाराची पोलखोल झालीय. त्यात निवासी इमारतीतील भाडेकरू हक्क संपादन करण्यासाठी सुमारे 10 कोटी रोख दिले. गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटींचे पेमेंट केले. ‘मातोश्री’ला 50 लाखांचे घड्याळ पाठवले, अशा नोंदी आहेत. याबाबत आयकर विभागाने जाधवांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी चलाखीने या विषयाला बगल देत डायरीतील ‘मातोश्री’ हा उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचे म्हटले आहे. आपल्याला दानाची 2 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. याचा वापर मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या भेटवस्तू देण्यासाठी केला. माझ्या आईच्या नावावर लोकांना घड्याळांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला, पण दुसरीकडे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराचे नावही ‘मातोश्री’ आहे. त्यामुळे या उत्तरावर आयकर विभागाचे समाधान झाले नसल्याचे समजते.
पत्नीच्या प्रतिज्ञापत्रातून पोलखोल
यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी 2019 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोलकाता येथील प्रधान डिलर्स प्रायवेट लिमिटेड कंपनीसोबतच्या व्यवहाराचा उल्लेख आहेत. या कंपनीने त्यांना 15 कोटी रुपये दिलेत. जाधव आणि कुटुंबाने यातून भायखळ्यातील एका इमारतीत गुंतवणूक केली. कालांतराने जाधव कुटुंबाने हे पैसे कंपनीला परत केले. त्यानंतर कंपनीने हे पैसे न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीला हस्तांतरीत केले. मुंबई महापालिकेच्या तब्बल 30 कोटी रुपयांच्या अनेक कंत्राटांसाठी यशवंत जाधव यांनी बिमल अग्रवाल यांची बाजू घेतल्याचा संशय आहे.
31 फ्लॅटची खरेदी, हवालातून दिले पैसे
यशवंत जाधव यांनी न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायवेट लिमिटेडच्या माध्यमातून कथितपणे भायखळ्यातल्या बिलकाडी चेंबर्समध्ये 31 फ्लॅटची खेरदी केली. इमारतीच्या चार ते पाच भाडेकरूंना 30 ते 35 लाख रुपये दिले. हवालाच्या माध्यमातून हे पैसे दिल्याचा संशय आहे. शिवाय आयकरने इतर 40 मालमत्तांचा तपास सुरू केलाय. त्या मालमत्ताही जाधव यांच्या असल्याचा संशय आहे.
1.75 कोटीचे हॉटेल, 20 कोटींना विकले
यशवंत जाधव यांच्या सासू सुनंदा मोहिते यांनी भायखळ्यातील इम्पिरियल क्राउन या हॉटलेची खरेदी केली होती. हे हॉटेल न्यूजहॉक मल्टीमीडियाने किरायाने घेतले होते. त्यानंतर न्यूजहॉकला मुंबई महापालिकेच्या क्वारंटाइन सेंटरचे कंत्राट मिळाले. या हॉटेलची खरेदी 1.75 कोटीला झाली होती. मात्र, विक्री तब्बल 20 कोटींच्या जास्त किमतीला झाली. या व्यवहारातील प्रधान डिलर्स प्रायवेट लिमिटेडची भूमिकाही चौकशीच्या फेऱ्यात आहे. आयकर विभागाने जाधव यांच्याकडून स्थायी समितीचे अध्यक्ष असतानाच्या काळात घेतलेल्या कंत्राटांची माहिती मागवलीय. शिवाय कंत्राटदारांची माहिती आणि त्यांना मुंबई महापालिकेने दिलेल्या पैशाची सविस्तर माहिती मागवल्याचे समजते.