‘ही दुर्बळांची भयभीत सभा’ – आशिष शेलार; ‘फोटोतलं तुफान थांबणार नाही’- संजय राऊत
मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज चांगलाच कलगीतुरा रंगलेला बघायला मिळतोय. भाजप नेते आशिष शेलार यांनी मविआच्या सभेवर टीका केली. त्यावर संजय राऊत यांनी फोटो ट्विट करत प्रत्युत्तर दिलं.
मुंबई : महाविकास आघाडीची मुंबईत आज वज्रमूठ सभा पार पडली. मुंबईतील बीकेसी मैदानात ही सभा पार पडली. या सभेला उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवरुन महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. पण त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फोटो ट्विट करत प्रत्युत्तर दिलं.
“आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आलेत. त्याला हे वज्रमूठ वगैरे म्हणतात. पण ही दुर्बळांची भयभीत सभा आहे. तिघे एकत्र आले तरी अजूनही भय संपले नाही. गोळाबेरीज सुरूच आहे. दुसरं कारण मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार म्हणून अगोदरच झोळी पसरून सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे यांची वज्रमूठ”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
आमचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आलेत, त्याला हे वज्रमूठ वगैरे म्हणतात… पण ही दुर्बळांची भयभीत सभा आहे. तिघे एकत्र आले तरी अजूनही भय संपले नाही. गोळाबेरीज सुरूच आहे. दुसरं कारण मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 1, 2023
संजय राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर
आशिष शेलार यांच्या टीकेला संजय राऊतांनी फोटो ट्विट करत प्रत्युत्तर दिलं. या फोटोत सभेसाठी जमलेली गर्दी दाखवण्यात आलीय. “आजची वज्रमूठ सभा. बीकेसी वांद्रे..1 मे.. भाजपच्या चिनी नजरेतून सगळ्यात लहान मैदानावरची लहान सभा. डोळ्यात महाराष्ट्र द्वेषाचा वडस वाढला असेल तर ऑपरेशन करून घ्या. हे तुफान थांबणार नाही”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.
आजची वज्रमूठ सभा.. BkC बांद्रे..1 मे.. भाजपच्या चिनी नजरेतून सगळ्यात लहान मैदानावरची लहान सभा.. डोळ्यात महाराष्ट्र द्वेषाचा वडस वाढला असेल तर ऑपरेशन करून घ्या .. हे तुफान थांबणार नाही.. जय महाराष्ट्र! pic.twitter.com/qJ79evUBql
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 1, 2023
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा प्रयत्न होतोय? ठाकरेंचे आरोप
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केले. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. “कोणीही मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी जो इशारा दिला होता तोच इशारा मी आता देतोय, जो कोणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडेल त्याचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा आमचा जाहीर इशारा आहे. पण मुंबई तोडता येत नाही म्हणून मुंबईला मारुन टाकायचं. मुंबईची हत्या करायची. हे यांच्या भांडवलदार वृत्तीचे मनसूबे आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.