विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ठाकरे गटाची मोठी रणनीती, नेमका प्लॅन काय?
ठाकरे गटाची आज मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडून 120 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे काही प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत ठाकरे गटाची ताकद असलेल्या विधानसभेच्या जागांबाबत चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणूक लढवताना शिवसेना ठाकरे गट ज्या मतदारसंघांमध्ये आपली ताकद आहे ते मतदारसंघ आपल्याकडे टिकवण्यासाठी आग्रही असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 120 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. महाविकास आघाडीमध्ये समसमान वाटप झाल्यास 90 ते 100 जागांवर शिवसेना ठाकरे गट आपले उमेदवार देईल, अशी माहिती मिळत आहे.
जे मतदारसंघ ठाकरेंचे पारंपारिक मतदारसंघ आहेत तिथे संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजन करावे लागणार असल्याची चर्चा झाली. उद्धव ठाकरेंनी आजच्या बैठकीत आपल्या नेत्यांकडून मुंबई, मराठवाडा, कोकण, जिथे शिवसेनेची प्रामुख्याने ताकद आहे, याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा संदर्भात चर्चा केली. आपल्या नेत्यांकडून कुठल्या मतदारसंघांमध्ये आपली ताकद अधिक आहे, ज्या महाविकास आघाडीमध्ये आपल्याकडे असव्यात याबाबत विस्तृत आढावा घेण्यात आला.
ठाकरे गट सर्व 288 जागांवर तयारी करणार
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा, तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला आघाडी मिळाली आहे, त्या जागा ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीत मागितल्या जाऊ शकतात. एकीकडे ठाकरे गटाने महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असताना, दुसरीकडे सर्व २८८ विधानसभा क्षेत्रात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आगामी काळात रणनीती ठरवली जाईल, अशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या एकत्रित होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्यानंतर लवकरच महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.