‘पोलीस सुरक्षा सोडून मैदानात या, कुणाला पुरावा, तुडवावा की गाडावा हे…’, ठाकरेंचं ओपन चॅलेंज
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाबाबत दिलेल्या निकालावर ठाकरे गटाचा आक्षेप आहे. ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद घेऊन निकालावर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलीस सुरक्षा सोडून समोर येण्याचं चॅलेंज दिलं आहे.
मुंबई | 16 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुरुवातीला वकील असीम सरोदे यांनी भूमिका मांडली. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेला निकाल कायदेशीररित्या कसा चुकीचा आहे, याचं विश्लेषण असीम सरोदे यांनी केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भूमिका मांडली. परब यांनी यावेळी शिवसेनेच्या 2013च्या प्रतिनिधी सभेचा थेट व्हिडीओच दाखवला. या प्रतिनिधी सभेत राहुल नार्वेकर हे देखील दिसले. यावेळी मंजूर करण्यात आलेल्या सहा ठरावांची अनिल परब यांनी माहिती दिली. अनिल परब यांच्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांना पोलीस सुरक्षा सोडून जनतेच्या समोर येण्याचं चॅलेंज दिलं.
“माझं तर आव्हान आहे नार्वेकर आणि मिंध्यांनी जनतेत यावं. पोलीस प्रोटोक्शन घ्यायचं नाही. मीही एक पोलीस घेणार नाही. तिथे नार्वेकर यांनी सांगावं शिवसेना कुणाची. मग जनतेने सांगावं कुणाला पुरावा, तुडवावा की गाडावा. माझ्यात हिंमत आहे. माझी तयारी आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “शिवसेना तुम्ही विकली असाल ती काही विकावू वस्तू नाही. आज इथे शिवसैनिक आहे. आज लाखो शिवसैनिक माझ्यासोबत कसे?”, असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
“तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणार. लायकी आहे का? गर्दीत गारद्यांच्या शामील रामशास्त्री… सुरेश भट म्हणतात. आता मेल्याविन मढ्याला उपायच नाही. दुसरा उपायच नाही. आपण फक्त मढं पाहणार की लोकशाहीच्या खुन्यांचं मढं करणार? म्हणजे राजकारणात. एकूणच जी काही थट्टा सुरू आहे. घटना नाही, घटना नाही… हे काय आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
‘निवडणूक आयोग काय त्यावर गाद्या करून झोपलंय का?’
“अनिल आणि असीम मी म्हणतो बरोबर की चूक ते सांगा. निवडणूक आयोगावर केस केली पाहिजे. १९ लाख ४१ हजार शंभर रुपयांच्या स्टँम्पवर शपथपत्र पुरवली होती. निवडणूक आयोग काय त्यावर गाद्या करून झोपलंय का? एक तर ते स्वीकारा आमचा हक्क आम्हाला द्या. १९ लाख ४१ हजार इनटू आम्हाला द्या. हा मोठा घोटाळा आहे. शिवसैनिकांचे पैसे गेले आहेत. ते काही दोन नंबरचे नाही. ईडी त्यांचे नोकर आहे. उघड बोलतो. काय करणार आहेत. बघून घ्याल तुम्ही. मला काय चिंता. मी मुद्दाम पीसी घेतली. २०१८ रोजी इथेच शेवटची निवडणूक झाली होती. २०१३ मध्ये कोण कोण होते पाहिले. राम राम गंगारामही होते त्यात”, असा टोला ठाकरेंनी लगावला.
‘कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं ते गंभीर’
“नालायक लोक घेऊन गिळायला निघाला. आज ठिक आहे. उद्या बघून घ्या. गिळल्यानंतर २४ तासाने काय होणार. काही लोक म्हणतात उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर… मला सत्तेचा मोह नाही. मी कायदा पाहत नाही. मी दिला राजीनामा… कोर्टाने म्हटलं तुम्हाला मुख्यमंत्री केलं असतं. पण कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं ते गंभीर आहे. अधिवेशन बोलावलं ते असंवैधानिक होतं. म्हणजे सरकारच असंवैधानिक होतं. कोश्यारी त्या कटात सहभागी झाले. ही फक्त शिवसेनेची लढाई नाही. उद्धव ठाकरे यांची नाही. या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही याची लढाई. सुप्रीम कोर्टाचं अस्तित्व राहणार की नाही की त्याच्या डोक्यावर लवाद बसेल याची ही लढाई आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वोच्च मानायाचा की या लबाडाचा मानायचा हे महत्त्वाचं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.