Maharashtra Bandh : ‘कोर्टाचा निर्णय मान्य नाही, पण…’, शरद पवार आणि काँग्रेसच्या माघार नंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
"कोर्टाचा निर्णय मान्य नाही. पण कोर्टाचा आदर ठेवावा लागतो. आम्ही या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. पण कोर्टात जाणं आणि निर्णय मिळण्याला अवधी जाऊ द्यावा लागतो. बंदचं कारण वेगळं होतं. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ नाही. त्यामुळे जनतेच्या मनातील उद्रेक उफाळला तर सर्वांना कठीण होईल", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली. पण त्यांच्या या आवाहनानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर हायकोर्टात आज तातडीची सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने तसा बंद करता येणार नाही, असं म्हटलं आहे. “कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा”, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. मुंबई हायकोर्टाच्या या आदेशानंतर राज्य सरकारने अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. पोलिसांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यास सुरुवात केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत बंद मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यांच्या आवाहनानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष होतं. अखेर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनीदेखील आता बंद मागे घेतला आहे. पण तरीही आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा ठाकरेंनी दिला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“आज दुपारी उद्याच्या बंद बाबत मी तुमच्याशी बोललो. उद्याच्या बंद बद्दल काही सूचना आज दिल्या होत्या. उद्याचा बंद विकृती विरोधी होता. होता हा शब्द वापरतो कारण कोर्टाने तत्परतेने या बंदला मनाई केली आहे. एका गोष्टीचं बरं वाटलं. कोर्ट एवढ्या तत्परतेने हलू शकतं हे कौतुकास्पद आहे. तुम्ही तत्परतेने निर्णय दिला, तशीच तत्परता तुम्ही जे गुन्हे घडता त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठीही दाखवा”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केलं.
“कोर्टाचा निर्णय मान्य नाही. पण कोर्टाचा आदर ठेवावा लागतो. आम्ही या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. पण कोर्टात जाणं आणि निर्णय मिळण्याला अवधी जाऊ द्यावा लागतो. बंदचं कारण वेगळं होतं. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ नाही. त्यामुळे जनतेच्या मनातील उद्रेक उफाळला तर सर्वांना कठीण होईल. पवारांनी आवाहन केलं आहे. आम्हीही बंद मागे घेत आहोत. पण गावात आणि शहरातील मुख्य चौकात आघाडीचे नेते कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती लावून निषेध करतील. आम्ही तोंडच बंद करू. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? मोर्चे हडताळ यावर बंदी आहे का? लोकांनी भावना व्यक्त करू नये का. यावर घटनातज्ज्ञांनी बोललं पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘तोंडाला काळी पट्टी बांधून शिवसेना भवनाजवळ बसणार’
“मी दोन तास आंदोलन करणार आहे. तोंडाला काळी पट्टी बांधून शिवसेना भवनाजवळ बसणार आहे. माझं रक्षण करण्यासाठी कोणी येत नाही असं लोकांना वाटतं, तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात. बांगलादेशात ते पाहिलं. ते आपल्या देशात होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आहेत. आमचं आंदोलन थांबणार नाही”, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
“उद्या 11 वाजता एक दोन तासांसाठी शिवसेना भवनातील चौकासमोर आंदोलन करणार. खरंतर याचिकाकर्त्याने या कारणासाठी कोर्टात जायला नको होतं. जिथे आई बहिणींचा विषय येतो तिथे त्यांनी संवेदनशील व्हायला हवं होतं. आता उद्या जर कुणावर अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी याचिकाकर्ते आणि कोर्टावर असेल”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
‘बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर…’
“कायदा ज्यांच्या हातात असतो ते बेजबाबदारपणे वागत असतील त्याचा उल्लेख कोर्टाने केला आहे. कोर्टानेच काल सरकारला विचारलं होतं. भावना व्यक्त करण्याचा अधिकार लोकांना आहे की नाही. बंद म्हणजे दगडफेक करा, हिंसाचार करा असं म्हटलं नव्हतं. ही गोष्ट घडली ती चिंतेची आहे. सर्वांना आपल्या कुटुंबाची काळजी आहे. बहीण, आईची काळजी आहे. तिचं रक्षण करणारं कोण आहे, हे सर्वांच्या मनात आहे. बंद करायचा म्हणून प्रयत्न केला. बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर तोंडच बंद करणार आहोत. मी स्वत शिवसेनाभवनातील चौकात जाऊन बसणार आहे. तोंडाला काळीफित लावणार आहे. मला वाटतं तिथे मला कोणी रोखू शकणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘बंद होणार नसलं तरी आंदोलन करणार’
“चौकात बसायला मनाई होत असेल तर जनतेच्या न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही. या घटना घडत आहेत. त्याची जबाबदारी कोण घेत आहे. उद्या अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी याचिकाकर्त्यावर राहील. कोर्ट या अत्याचारांची जबाबदारी घेणार आहे का. महिलांवरील अत्याचार करणारे जे नराधम आहेत, त्यांच्यावर वचक बसण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. बंद होणार नसलं तरी आंदोलन करणार आहोत. माता भगिनींसाठी सुरक्षित बहीण हे आंदोलन करणार आहोत”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
‘पुन्हा सांगतो, कोर्टाचा निर्णय मान्य नाही’
“बंद आम्ही उद्याच जाहीर केला होता. पवारसाहेब आणि पटोले बाहेर आहेत. त्यामुळे एकत्र बसून निर्णय घेऊ शकलो नाही. फोनवरून बोलणं झालं. पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. उद्या परवा आम्ही बसून चर्चा करू. भविष्यात बंद करणार नाही, असं नाही. संप करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे. पुन्हा सांगतो, कोर्टाचा निर्णय मान्य नाही.पण कोर्टाचा आदर करून आम्ही निर्णय स्वीकारत आहोत. पण आम्ही बंद करणार नाही. आंदोलन करूनच स्वातंत्र्य मिळालं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही. तेही महिलांविरोधातील अत्याचारांविरोधात आंदोलन करायचे नाही. हे काही पटत नाही. त्यांचे काही सदाआवडते लोक आहेत. ते नेहमी कोर्टात जातात आणि निर्णय घेऊन येतात. मागे मराठा आरक्षणाच्या विरोधातही ते गेले होते”, असं ठाकरे म्हणाले.