रामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी तणाव, संजय राऊत यांचा थेट भाजपवर गंभीर आरोप
राज्यात आणि देशातील काही ठिकाणी रामनवमीच्या दिवशी काही अनपेक्षित घटना घडल्या. या घटनांवरुन खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या 2 एप्रिलच्या सभेला कुणीही रोखू शकत नाही, असंही ते म्हणाले.
मुंबई : महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) येत्या 2 एप्रिलला संभाजीनगरमध्ये मोठी सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. संभाजीनगरमध्ये एका ठिकाणी रामनवमीच्या दिवशी दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर आलेली. याशिवाय राज्य आणि देशातील अनेक ठिकाणी देखील तणाव निर्माण झालेला बघायला मिळालं. या सगळ्या घटनांवरुन संजय राऊत यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. “मला हे माहिती आहे की, आपली सत्ता वाचवण्यासाठी आणि निवडणुकीत जिंकून येण्यासाठी हे देशात दंगल घडवून आणू शकतात. ही त्यांची सवय आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
“भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे काय म्हणतात त्यावर महाराष्ट्रातलं राजकारण चालत नाही. याशिवाय त्यांच्या म्हणण्यावर त्यांचा पक्षही चालत नाही. महाराष्ट्रात नाही तर देशभरात दंगली झाल्या, मथुरा, पश्चिम बंगाल, जळगाव, संभाजीनगर आणि इतर ठिकाणी तणाव निर्माण झाला. हे कुणी केलं? हेच लोकं करत आहेत. यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे दंगल घडवून वातावरण खराब करायचं आणि मग हिंदुत्वाच्या नावाने बोंब मारायची, हे देश तोडण्याचं कारस्थान करत आहेत”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
“मुंबईपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात गुढीपाडव्याला शोभायात्रा निघाल्यात. अत्यंत उत्तमपणे या शोभायात्रा निघाल्यात. त्यावेळेला दंगली झाल्या नाहीत. त्यावेळेला कुणी एकमेकांवर दगड मारले नाहीत, शिवीगाळ झाली नाही. मग आता रामनवमीच्या निमित्तानेच हे प्रकार का झाले? हा तपासाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातल्या सरकारला तपास करता येत नसेल तर ठिक आहे आम्ही तुम्हाला माहिती देऊ”, असं संजय राऊत म्हणाले.
‘संभाजीनगरची सभा कोणीच रोखू शकत नाही’
“महाविकास आघाडील म्हणून ही पहिली सभा आहे. तीन पक्षांची ही एकत्रित अशी पहिली सभा आहे. शिवसेनेची खेड, मालेगाव येथे सभा झाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या सभा फार जोरात घेतल्या. आपण ते पाहिलं. मालेगावची सभा तर ऐतिहासिक आहे. पण महाविकास आघाडीची सभा एकत्र होणार आहे. त्याचं एक वेळापत्रक ठरलं आहे. त्यातली पहिली सभा मराठवाड्यातील संभाजीनगर येथे 2 एप्रिलला आहे. त्या सभेची तयारी पूर्ण झालेली आहे”, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
“माझी आताच अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यासोबत चर्चा झाली. शिवसेनेने ती सभा यशस्वी होण्यासाठी पूर्ण झोकून दिलं आहे. मग त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. सगळी एकत्र आलो आहोत. रामनवमीच्या निमित्ताने तिथे दंगल झाली. वातावरणात थोडाफार तणाव असू शकेल. सभेला गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे. दंगलसदृश्य परिस्थिती किंवा तणाव निर्माण झाला तर सभा रद्द होईल, अशी चुकीची अफवा पसरली जात आहे”, अशी भूमिका राऊतांनी मांडली.
“उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्या सभेला उपस्थित राहणार आहेत. इतर काही नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सभा ठरल्याप्रमाणे होईल. इतर काही बदल होणार नाही. सभा होईल, सभा रद्द होणार नाही, एवढंच मी सांगेन”, असं राऊतांनी स्पष्ट केलं.
“प्रशासन, पोलीस यांच्यावर दबाव आणून आमच्यावर काही अटी-शर्थी आणल्या जातील. पण देशामध्ये अजूनही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही लोक आहोत. जे आम्हाला बोलायचं आहे ते बोलावं लागेल. जाहीर सभा आहे, हजारो लोकं येतील. ते आमच्या नेतत्यांचे विचार ऐकण्यासाठी येतील. त्यातून कुणाला आक्षेपार्ह वाटलं तर त्यावर नंतर चर्चा करता येईल. पण कुणालाही सभा थांबवता येणार नाही”, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.