Sachin Ahir : मुंबईसाठी केंद्राच्या पाच योजना दाखवा, मुंबईवरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपाला सचिन अहिर यांचं आव्हान
गेल्या दोन वर्षात केंद्राने किती निधी महाराष्ट्राला दिला, असा सवाल अहिर यांनी भाजपाला केला आहे. पुण्यात त्यांची सत्ता म्हणून स्मार्ट सिटी लागू केली. आता तिथे भकास झाले आहे, असे सचिन अहिर म्हणाले.
मुंबई : आमच्या कामांची चर्चा जगात झाली आहे. डायलॉगबाजी करून निवडणुका जिंकता आल्या असत्या तर अनेक डायलॉग आहेत, असा टोला शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी भाजपाला लगावला आहे. शिवसेनेच्या उपनेत्यांची तसेच संपर्क प्रमुखांची आज बैठक झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, की उपनेते प्रामाणिकपणे काम करत आहेत. अनेक विषयांवर चर्चा झाली, पक्षाचे प्रवक्ते यासंदर्भात माहिती देतील. काही उपनेत्यांना अधिकची जबाबदारी दिली आहे. लवकरच मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा घेण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC election 2022) पार्श्वभूमीवर शिवसेनेला लक्ष्य केले. आज झालेल्या भाजपाच्या मेळाव्यातही आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीका केली होती. त्याचा सचिन अहिर यांनी समाचार घेतला.
‘आशिष शेलारांची लाइन रोज बदलत आहे’
आशिष शेलारांची लाइन रोज बदलत चालली आहे. आधी ते बांद्रा येथे उभे राहायचे. आता ते वरळीत आलेत. मुद्दे काय असणार, नसणार ही चर्चा गेल्या वर्षभरापासून आहे. जे काम केले ते आम्ही लोकांसमोर ठेवले आहे, असे सचिन अहिर म्हणाले.
‘गेल्या दोन वर्षात किती निधी दिला?’
गेल्या दोन वर्षात केंद्राने किती निधी महाराष्ट्राला दिला, असा सवाल अहिर यांनी भाजपाला केला आहे. पुण्यात त्यांची सत्ता म्हणून स्मार्ट सिटी लागू केली. आता तिथे भकास झाले आहे, असे ते म्हणाले. बुलेट ट्रेनने मुंबईचा विकास होणार आहे का? केंद्राच्या पाच योजना मुंबईसाठी दाखवा, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
‘जांबोरी मैदानाची दुरवस्था करणाऱ्यांविरोधात बीएमसीला निवेदन देणार’
कोट्यवधी रुपये खर्च करून जांबोरी मैदानाचे सुशोभिकरण केले. स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते, की इथे कार्यक्रम नको. मात्र भाजपाने त्याठिकाणी कार्यक्रम केला. आता जांबोरी मैदानाची दुरवस्था ज्यांनी केली त्यांच्याकडून भरपाई करून घेतली पाहिजे यासाठी आम्ही पालिकेला निवेदन देणार आहोत, असे सचिन अहिर यांनी सांगितले.