Sushma Andhare | मोठा गौप्यस्फोट, सुषमा अंधारे यांच्यासोबत कोण मांडवली करण्याचा प्रयत्न करतोय?
सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना मोठा गौप्यस्फोट केला. आपल्याला घाबरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण पडद्यामागे आपल्यासोबत मांडवली करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा मोठा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केला.
मुंबई | 24 ऑक्टोबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. काही नेते आपल्यावर एकीकडे अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा कॅमेऱ्यासमोर करत आहेत. पण मुळात पडद्यामागे ते आपल्यासोबत मांडवली करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा मोठा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजप नेत्यांवर सडकून टीका केली.
“मी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडत आहे. हा महाराष्ट्र ड्रग्जमुक्त, नशामुक्त झाला पाहिजे. आज सद्गुणांनी दुर्गुणांवर मात करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ नये म्हणून आम्ही सातत्याने भूमिका मांडतोय. मी तुम्हाला आकडेवारी आधी सांगितली पाहिजे. नाशिकमध्ये 10 ऑक्टोबरला 300 कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा सापडला. 16 ऑक्टोबरला सोलापूरमध्ये 16 कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा सापडला”, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
“19 ऑक्टोबरला मुंबईत 71 कोटींचं कोकेन जप्त केलं गेलं. 22 ऑक्टोबरला संभाजीनगर येथून 500 कोटींचं कोकेन जप्त केलं गेलं. 23 ऑक्टोबरला पालघरमध्ये पुन्हा ड्रग्जचा कारखाना सापडला. आता येताना एक बातमी बघितली, ड्रग्ज नष्ट करण्यासाठी मुळा नदीच्या पात्रातच ड्रग्ज सोडण्याचा प्रयत्न झाला. काय परिस्थिती आहे?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
‘मंत्री धमकावतात, घाबरवतात’
“आम्ही साधी भूमिका मांडली की, नाशिकला एवढा शेकडो कोटींचा ड्रग्ज सापडतो तर नाशिकचा पालकमंत्री काय गोट्या खेळत होता का? आम्ही भूमिका मांडतोय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री आणि अधिकारी काय करतात? अशी भूमिका आम्ही मांडतो. पुण्यातील एसपींचं काय चाललेलं असतं? हे सगळे प्रश्न विचारले की, मंत्री धमकावतात, घाबरवतात, आणि म्हणतात काय, आम्ही तुमच्यावर अब्रुनुकसाणीचा दावा करु. आम्ही नोटीस पाठवू. आम्ही हे करु, ते करु”, असं अंधारे म्हणाले.
‘माझ्याशी मांडवली करण्याची भाषा’
“मी माध्यमांसमोर सांगते, दहा दिवसांपासून मला नोटीस पाठवतो असं म्हणणारे लोक अंधारातून माझ्याशी मांडवली करण्याची भाषा करतात. नावं घ्यायची का? नाशिकमधला अमन परदेशी पुण्यातील नलिनी वायाडला फोन करतो. पुण्यातील निलीनी कुणातरी गोगावलेला फोन करते. गोगावले पोहोचतात माझ्याजवळच्या जठारपर्यंत. दबाव आणतात, घाबरवतात, आणि सांगतात की, आम्ही अब्रुनुकसानी. अरे मीडियात एक बोलता दुसरीकडे दुसरं बोलतात. अरे खरं काय, खोटं काय?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
“सुरत, गुवाहाटीला जाताना अब्रु कुठे होती? बीड जिल्ह्यात पारधी समाजाच्या माय माऊलीच्या पदराला हात घालताना तिची अब्रुची किंमत तुम्हाला वाटली नाही का? तुम्ही सांगणार अब्रुबद्दल? आमच्या गावाला एक म्हणणं आहे. मला नाही अब्रु मी कशाला घाबरु? यांना अब्रु असेल तर हे बोलतील ना?”, असे सवाल अंधारे यांनी केले.
“मी प्रश्न विचारते गृहमंत्र्यांना, तर ते म्हणतात आवाज बंद होतील. ललित पाटील आमच्या संघटना पदाधिकारी कधीच नव्हता. गृहमंत्री म्हणून ललित पाटीलला कोणता आजार होता म्हणून तुम्ही त्याला नऊ महिने रुग्णालयात ठेवलं?” असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला.