हिंदी भाषिक मते मिळवण्यासाठीच योगी यांच्या रोड शोचा ‘उद्योग’; ‘सामना’तून हल्लाबोल
योगींना उद्या दिल्लीत झेप घ्यायची आहे. तेव्हाही त्यांना इंधन लागणार आहे, असे सूचक संकेतही सामनातून देण्यात आल्याने तर्कवितर्क लढवण्यात येत आहे.
मुंबई: उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी हॉटेल ताज समोर रोड शो केला. त्यावरून दैनिक ‘सामना’तून जोरदार टीका करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांना रोड शो करण्याची गरजच काय? असा सवाल करतानाच राज्यातील फुटकळ नेत्यांचा सल्ल्याने वागून योगींनी स्वत:ची अप्रतिष्ठा करून घेऊ नये. तसेच उद्योगपतींच्या नावाखाली मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांची गुंतवणूक करण्याचा हा उद्योग आहे, असा आरोप दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. तसेच भाजपवरही टीका करण्यात आली आहे. या शिवाय गुजरातमध्ये महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यात आल्याच्या मुद्द्यावरूनही भाजपला घेरलं आहे. मुंबईतील योगींचा रोड शो हा भाजप पुरस्कृत राजकीय खेळ आहे, असा आरोपच सामनातून करण्यात आला आहे.
राज्यातील रोजगार बुडाल्यावरूनही त्यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राचे अडीच लाख कोटी गुंतवणुकीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन लाख लोकांचा रोजगार बुडाला आहे. राज्यातील रोजगार गुजरातला वळवण्यात आल्यानेच हे घडल्याचा दावा करतानाच मुंबई बाबत लंगडतोड सुरू आहे.
तरीही आम्ही योगींचं मुंबईत स्वागत करतो. मुंबईच्या इंधनावर तुमच्या विकास इंजिनाची गती वाढते आहे. त्यामुळे महाराष्ट्राशी इमान राखा, असा सल्लाही सामनातून योगींना देण्यात आला आहे. या शिवाय योगी हे भगव्या वस्त्रातील सत्पुरुष असून त्यांच्या एक राजकारणी दडला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
योगींना उद्या दिल्लीत झेप घ्यायची आहे. तेव्हाही त्यांना इंधन लागणार आहे, असे सूचक संकेतही सामनातून देण्यात आल्याने तर्कवितर्क लढवण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ महाराज वरचेवर मुंबईत येत असतात. त्यात गैर काहीच नाही. पण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगींना मुंबईत रोड शो करण्याची गरज काय? असा सवालही त्यांनी केला आहे.
या रोड शोवरही ‘सामना’तून सवाल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा रोड शो झाला काय? त्यावर किती दौलतजादा खर्च झाली? या रोड शोमध्ये किती आणि कोणते उद्योगपती सामील होते? असा सवालही करण्यात आले आहेत.