अनिल बोंडे यांचा बोलविता धनी कोण? देवेंद्र फडणवीस?; दैनिक ‘सामना’तील दावा काय?
शिंदे गट आणि भाजपमध्ये कोणताच वाद नाही. सर्व काही अलबेल आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. असं असेल तर मग फडणवीस यांची कानदुखी का बरी होत नाही? असा सवाल दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
मुंबई : भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करून शिंदे गटाला डिवचले आहे. बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही, असं अनिल बोंडे म्हणाले. बोंडे यांची ही टीका शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे शिंदे गटाने बोंडे यांना त्यांची औकातच दाखवली आहे. दोन्ही गटात ही शाब्दिक चकमक सुरू असतानाच ठाकरे गटानेही या वादात उडी घेतली आहे. अनिल बोंडे यांचे बोलविते धनी दुसरे तिसरे कोणी नसून देवेंद्र फडणवीस असल्याचा दावाच दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप आणि शिंदे गटातील वादावर भाष्य करण्यात आलं आहे. या अग्रलेखातून शिंदेगट आणि भाजप या दोघांवरही जोरदार टीका करण्यात आली आहे. फडणवीस यांच्या प्रवक्त्याने एकनाथ शिंदे याना बेडूक म्हटले. तरी बेडकांची चाळीस पिले तोंडातून अक्षर काढायला तयार नाहीत. सगळे चिडीचूप आहेत. शिंदे यांची उडी ठाणअयाच्या पलिकडे नाही. त्यांना ठाणे म्हणजे महाराष्ट्र वाटतो काय? असा सवाल बोंडे यांनी केला आहे. बोंडे यांच्या तोंडातून फडणवीसच बोलत आहेत, असा दावा दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
कानदुखी का बरी होत नाही?
शिंदे गटाच्या जाहिरातीने भाजपला लुळेपांगळे झाल्यासारखे वाटले. त्यामुळे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरचा त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द केला. त्यासाठी फडणवीस यांनी कानदुखत असल्याचं कारण दिलं. नंतर मुख्यमंत्र्यांसोबतचे इतर दौरेही रद्द करून फडणवीस शांत बसले. नंतर शिंदे गटाने दुसरी जाहिरात दिली. त्यानंतरही फडणवीस यांची कानदुखी बरी झाली नाही. त्यांच्या कानदुखीचे दुखणे मानेपर्यंत गेले की काय? असा सवाल करतानाच सर्व काही अलबेल असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणत आहे. मात्र, असे असेल तर फडणवीस यांची कानदुखी का बरी होत नाही? असा सवालही दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
कानदुखी ते गाडीदुखी
पालघरमध्ये शिंदे आणि फडणवीस एकत्र होते. पण मुख्यमंत्र्यांनी आग्रह करूनही फडणवीस यांनी त्यांच्या गाडीत बसण्यास नकार दिला. कधीकाळी याच मुख्यमंत्र्यांचे फडणवीस चालक बनले होते. त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. मात्र पालघरमध्ये फडणवीस स्वतंत्र गाडीतून गेले. याचा अर्थ काय? कानदुखी ते गाडीदुखी असा हा प्रवास आहे, असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे.
हितचिंतक कोण?
फडणवीस यांनी कच खाऊन राज्यात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. म्हणून शिंदे हे श्रेष्ठ ठरू शकत नाही. शिंदे गट हा फडणवीस यांचा मांडलिकच आहे आणि मांडलिकच राहणार आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे. मिंधे गटाच्या ज्या जाहिरातीवरून वाद झाला. ती जाहिरात हितचिंतकाने दिल्याचा दावा केला जात आहे. 20 ते 25 कोटी खर्च करून जाहिरात देणारा हा अज्ञात हितचिंतक कोण ? त्याने इतका खर्च का केला? हे महाराष्ट्राला कळायलाच हवे, असं सांगतानाच आर्थिक गुन्हे शाखेने हा काळा व्यवहार शोधलाच पाहिजे, अशी मागणीही करण्यता आली आहे.