हिंमत असेल तर अजितदादा यांना गद्दार म्हणून दाखवा; उदय सामंत यांचं आव्हान
सोमवारपासून इर्शाळगड येथील सर्च ऑपरेशन बंद करण्यात येणार आहे. मात्र, स्थानिकांच्या पुनर्वसनाचं काम सुरू राहणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
मुंबई | 24 जुलै 2023 : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे गट आणि भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर शिंदे गटाला गद्दार म्हणणं अचानक बंद झालं आहे. त्यावरून राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटाला डिवचलं आहे. हिंमत असेल तर अजित पवारांना गद्दार बोलून दाखवा. अजितदादा आमच्यासोबत आल्यापासून गद्दार बोलणं बंद झालं आहे. त्याबद्दल मी अजितदादांचं आभारच मानतो, असं सांगतानाच अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे काल काही लोक बुके घेऊन त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आले होते, असा चिमटाही उदय सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला.
उदय सामंत काल मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी इर्शाळगडावरील रेस्क्यू ऑपरेशनचीही माहिती दिली. सोमवारपासून इर्शाळगड येथील सर्च ऑपरेशन बंद करण्यात येणार आहे. मात्र, स्थानिकांच्या पुनर्वसनाचं काम सुरू राहणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. हे लोक राज्य सरकारवर टीका करत आहेत. पण यांच्या टीकेत तथ्य नाही. हे सरकार लोकांचं आहे. गतिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळगड येथे दीड तास पायी चालत गेले. त्यावर हे लोक काही बोलत नाही. अशी दुर्घटना घडली असती तर हे लोक पायी चालत गेले असते का? असा सवाल उदय सामंत यांनी केला आहे.
मोदींनीच उत्तर दिलंय
अरविंद सावंत काय किंवा यशोमती ठाकूर काय किंवा संजय राऊत काय ज्या पद्धतीने टीका करतात, आम्हाला वाटते यांच्या पोटामध्ये गोळा उठलेला आहे. त्यांना सरकार ज्या पद्धतीने काम करते ते पाहवत नाही. ते विरोधक आहेत, टीका करणारच. त्यांना टीका करू द्या. पण यांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला अधिक काही बोलण्याची गरज नाहीये. ते तर मुख्यमंत्र्यांची स्तुतीच करतात, असंही सामंत यांनी सांगितलं.
राऊत बोलत राहतात, तथ्य नाही
संजय राऊत यांच्या बोलण्यामध्ये कुठलेही तथ्य नाहीये. ते विरोधात बसतात म्हणून काहीतरी बोलणं त्यांना भाग आहे. ते बोलत राहतात आम्ही ऐकत राहतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
फडणवीस यांचं मन मोठं
देवेंद्र फडणवीस यांनीच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन फार मोठा आहे. ही गोष्ट खरी आहे की, त्यांनीच शिफारस केली होती आणि त्यासाठी जर आरोप-प्रत्यारोप होत असेल तर त्याला काही अर्थ नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिंदेच मुख्यमंत्री राहणार
राज्य सरकार स्थिर आहे आणि राज्य सरकार स्थिर राहील. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील हे देखील तितकच सत्य आहे. कोणी कितीही आदळापट केली तरीदेखील त्यांच्या हाती काहीही लागणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.