धारावीसाठी ठाकरे गटाचा मोर्चा, कोणाचा सहभाग, कोठून सुरु होणार वाचा A to Z माहिती
Shivsena Uddhav Thackeray Group Protest | शिवसेनेचा शनिवारी मोर्चा निघणार आहे. धारावीच्या विकासासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. धारावीतील टी जंक्शन येथे ठाकरे गटाच्या वतीने जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेचे झेंडे तसेच काँग्रेसचे झेंडे मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत.
निवृत्ती बाबर, मुंबई 16 डिसेंबर | राज्य सरकारने धारावीच्या विकासाचे काम अदानी समूहाकडे दिले आहे. त्याविरोधात आज शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता ठाकरे गटाचा हा मोर्चा आहे. मोर्चासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी केली गेली आहे. धारावीच्या चौकाचौकांत ३०० हून जास्त छोट्या सभा घेतल्या आहेत. या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.धारावीतील टी जंक्शन येथे ठाकरे गटाच्या वतीने जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेचे झेंडे तसेच काँग्रेसचे झेंडे मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत.
का काढण्यात येत आहे मोर्चा
धारावीच्या या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी सरकारने अदानी उद्योग समूहासला दिली आहे. या पुनर्विकास प्रकल्पात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. सरकारने टीडीओर बँक स्थापन करण्याची मागणी केली आहे.
कसा असणार धारावी मोर्चाचा मार्ग ?
धारावी टी जंक्शनपासून मोर्चाला सुरूवात होणार आहे. त्यानंतर कलानगर जंक्शनच्या आधीच उजव्या बाजूने हा मोर्चा बीकेसीकडे जाईल. सीएनजी पेट्रोल पंपपासून परिमंडळ 8 जवळ हा मोर्चा थांबणार आहे. त्याठिकाणी सभा होणार आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रमुख नेते भाषण करणार आहेत.
अशा आहेत मागण्या
- धारावीतील सर्व निवासी, अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा
- निवासी झोपडीधारकांना ५०० चौरस फुटांचे घर मोफत द्या. ‘टीडीआर’साठी सरकारने स्वतःची कंपनी नेमावी
- पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतींमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटांचे घर मोफत द्या
- नव्याने सर्वेक्षण करा. निवासी, अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करा
- प्रकल्पाचे स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लान आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या.
कोणाचा सहभाग असणार
मोर्चात १५ पक्ष, संस्था आणि संघटना सहभागी होणार आहे. शिवसेनेसह काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि पंधराहून अधिक संघटना सहभागी होणार आहे. तसेच धारावी भाडेकरू महासंघ आणि धारावीत सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, चाळ कमिट्या, संस्था, संघटना, मंडळे मोर्चात सहभागी होणार आहेत.