एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले?; दैनिक ‘सामना’तू न राष्ट्रवादीला सवाल
पण शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष नेमून कोणता संदेश दिला आहे? असा सवाल करतानाच कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केल्यानंतर पक्षावर घराणेशाहीचा आरोप होऊ नये म्हणून...
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मोठे फेरबदल केले आहेत. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पवारांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून पवारांच्या या निर्णयावर सवाल करण्यात आला आहे. एकाचवेळी दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले? असा सवालच आजच्या दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शरद पवार यांनी पक्षात बदल केले आहेत. त्यात धक्कादायक असं काहीच वाटत नाही. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही जणांच्या मते शरद पवार यांनी भाकरी फिरवली आहे. पण त्यात काही दम वाटत नाही, असं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. शरद पवार यांनी भाकरी फिरवली नसून ती आता कुठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवी भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
राष्ट्रवादी कुठे कुठे?
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचं देशात कुठे कुठे अस्तित्व आहे याची उजळणीही करण्यता आली आहे. राष्ट्रवादीने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला आहे. राष्ट्रवादीचे नागालँडमध्ये चारपाच आमदार आहे. लक्षद्वीपमध्ये एक खासदार आहे. केरळमध्ये एक दोन आमदार आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. मग एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.
मुद्द्यातील हवा काढली
देशाचा आकार पाहता एकाच नेत्याला सर्वच भागात पोहोचणे कठीण असल्याने दोन कार्यकारी अध्यक्ष नेमल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मोठे पक्ष देशाच्या राजकारणात आहेत. त्यांनाही देश मोठा असल्याने दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज पडली नाही. पण पवारांनी ते केलं, असं सांगत पवारांच्या मुद्द्यातील हवाही अग्रलेखातून काढून टाकण्यात आली आहे.
म्हणून दोन कार्यकारी अध्यक्ष
सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाच्या संघटनेची सूत्रे जाणार होती हे निश्चित होतं. पण शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष नेमून कोणता संदेश दिला आहे? असा सवाल करतानाच कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केल्यानंतर पक्षावर घराणेशाहीचा आरोप होऊ नये म्हणून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष नेमल्याचंही अग्रलेखातून म्हटलं आहे.
दादांना सल्ला
अजित पवार यांचा एक गट भाजपच्या दगडावर पाय ठेवून आहे, असं सांगितलं जातं, असं सांगतानाच अजित पवार हे भाजपच्या तंबूत जाऊन आले हा त्यांच्यावर ठपका आहे. तो दूर करण्यासाठी अजित पवार यांनाच शर्थ करावी लागेल, असा सल्लाही देण्यात आला आहे.