विद्यापीठाची भिंत तोडून मुंबईच्या भाग्योदयाची सुरुवात, तरीही पंतप्रधानांचे स्वागत असो नव्हे आहेच; दैनिक ‘सामना’तून चिमटे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला गेले होते. हा दौरा आटोपून ते परत आले. मुंबई विमानतळावर त्यांच्या गटाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी येताना खिशात एक लाख कोटींचे उद्योग करार आणले.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई नगरीत मोदींच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. भाजपने मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. ठाकरे गटाचं मुखपत्रं असलेल्या आजच्या दैनिक ‘सामना’तून मोदींचं स्वागत करण्यात आलं आहे. पण हे स्वागत करताना भाजपला चिमटे काढण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातून सवा दोन लाख कोटींचे प्रकल्प पळवून नेले. हा मुंबईवरील आर्थिक आघात आहे. महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेण्याचा प्रकार आहे. यालाच मुंबई-महाराष्ट्राचा भाग्योदय म्हणायचा का? असा सवाल करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील गाड्यांसाठी मुंबई विद्यापीठाची भिंत तोडण्यात आली.
मुंबईच्या भागोदयाची सुरुवात विद्यापीठाची भिंत पाडून झाली. मुंबईतील एका महत्त्वाच्या वास्तूवर हातोडे घातले जात आहेत. तरीही आमच्या पंतप्रधानांचे स्वागत असो, नव्हे आहेच, असा चिमटा ‘सामना’च्या अग्रलेखातून काढण्यात आला आहे.
चिपळ्या भाजप वाजवणार?
काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची आणि प्रचाराच्या चिपळ्या भाजप वाजवणार. पंतप्रधान मुंबईत येतील आणि मुंबईचा कायापालट करतील असे जाहीर करण्यात आले आहे. मुंबईचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व कमी करून केंद्र सरकारने कायापालट सुरू केला आहे, असा टोलाही ‘सामना’तून लगावण्यात आला आहे.
बेडूक गिळावा तसा
पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपने संपूर्ण मुंबईत झेंडे लावले आहेत. त्यात मिंधे गटानेही आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण मगरीने बेडूक गिळावा तसा हा गट गिळला गेला आहे. मगरीच्या जबड्यात जाताना हा बेडूक अखेरचे डराव डराव करत आहे. भाजपने जे कटआऊट्स लावले आहेत.
त्यात बाळासाहेबांपेक्षा भाजप नेत्यांचे कटआऊट्स सर्वाधिक मोठे आहेत. स्वत:ला बाळासाहेबांची शिवसेना म्हणवून घेणारे मिंधे यावरही मूग गिळून का बसले आहेत? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.
तोपर्यंत सरकार टिकेल काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला गेले होते. हा दौरा आटोपून ते परत आले. मुंबई विमानतळावर त्यांच्या गटाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी येताना खिशात एक लाख कोटींचे उद्योग करार आणले. ते करार जमिनीवर उतरल्यावरच स्वागत व्हावे. अर्थात तोपर्यंत हे सरकार टिकेल काय? असा सवालही करण्यात आला आहे.