प्रकाश आंबेडकर म्हणाले, लाईन मारण्याचं काम सुरूय; राऊत म्हणतात, उद्धव ठाकरे उद्या बोलतील
राहुल गांधी यांच्या यात्रेवर टीका करणाऱ्यांना त्यांची भीती वाटते. राहुल गांधी यांची यात्रे मागची भावना समजून घ्या. त्यांची भावना राष्ट्रहिताची आहे. त्यासाठी यात्रा आहे. साडे चार हजार किलोमीटर ते चालत आहेत.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या चर्चेवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल मिश्किल विधान केलं होतं. शिवसेनेवर आमचं लाईन मारण्याचं काम सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेपर्यंत काहीही होऊ शकतं, असं आंबेडकर म्हणाले होते. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारलं असता यावर उद्या उद्धव ठाकरे भाष्य करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे वंचित आणि शिवसेनेच्या युतीची उद्या अधिकृतपणे घोषणा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
संजय राऊत रक्तदान शिबीराला आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत उद्धव ठाकरे उद्या बोलणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे वंचित-शिवसेना युती अस्तित्वात येण्याचे संकेत मिळत आहेत.
आंबेडकर यांनी आमची युतीची चर्चा झाली आहे. जागा वाटपावर अद्याप चर्चा झाली नाही. पण आम्ही शिवसेनेसोबत युती करणार आहोत. आणि उद्धव ठाकरे हेच युतीची अधिकृत घोषणा करतील, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे संकट मानत नाही
उद्धव ठाकरे संकट मानत नाहीत. अशा अनेक संकटातून आपण पुढे गेलो आहोत. आपला भगवा झेंडा आहे तो फडकवत राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. गेल्या आठ वर्षापासून आपण रक्तदान शिबीर घेत आहोत. अनेक तरुण या शिबिरात भाग घेत असतात.
हे रक्त जे आहे ते सळसळणारा रक्त आहे. शिवसेनेचे रक्षण जे कोणी केला असेल तर या रक्ताने केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या माध्यमातून उभं राहायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेनेने रक्ताची गरज पूर्ण केली
शिवसेनेच्या सामाजिक कार्याची ओळख जर करायची असेल तर ती रक्तदान शिबिरापासून करायला पाहिजे. मुंबईत रक्तदान शिबिर आयोजित करण्याची प्रथा शिवसेनेने सुरू केली आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट आले, युद्ध असेल, भूकंप असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, महामारी असेल, जेव्हा जेव्हा रक्ताची चणचण जाणवली तेव्हा तेव्हा शिवसेनेने रक्ताची गरज पूर्ण केली, असं त्यांनी सांगितलं.
ते रक्तही सळसळून उठेल
रेड क्रॉस सारख्या जागतिक संघटनांनी सुद्धा रक्तदानाच्या संदर्भात शिवसेनेकडे अपेक्षेने पाहिले आहे. शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता देखील रक्तदान करण्यासाठी उत्सुक असतो. त्या रक्तात राजकारणाचा रंग नाही. यामध्ये फक्त राष्ट्रीय भावना आहे व सामाजिक भावना आहे. आम्ही जे सळसळत रक्त दिलेलं आहे ते ज्यांना जाईल ते सुद्धा सळसळून उठतील, असं ते म्हणाले.
त्यांना टीका करू द्या
राहुल गांधी यांच्या यात्रेवर टीका करणाऱ्यांना त्यांची भीती वाटते. राहुल गांधी यांची यात्रे मागची भावना समजून घ्या. त्यांची भावना राष्ट्रहिताची आहे. त्यासाठी यात्रा आहे. साडे चार हजार किलोमीटर ते चालत आहेत. देशासाठी तुम्ही 450 किलोमीटर तर चालून दाखवा, असा टोला त्यांनी लगावला.
काही लोकांना टीका करण्याचा काम आहे, त्यांना ते करू द्या, असं ते म्हणाले. राहुल गांधी माझ्याबरोबर मी त्यांच्याबरोबर जवळजवळ 14 किलोमीटर चाललो. त्या बर्फामधून आम्ही चाललो. ते आपल्या संघटने विषयी सतत माहिती घेत असतात, असं त्यांनी सांगितलं.