उद्यापासून मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; मुंबई महापालिका सज्ज, 9 केंद्रांवर लसीकरणाची सोय
उद्यापासून मुंबईमध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण झाली असून, मुंबईत 9 लसीकरण केंद्रांवर मुलांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनाचे सावट हळूहळू कमी होत आहे, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तसेच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील देशात शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहना मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली होती. पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार उद्यापासून मुंबईमध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण झाली असून, उद्यापासून मुंबईत 9 लसीकरण केंद्रांवर मुलांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्राधान्य
सुरुवातीला मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठीचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बसमधून लसीकरणासाठी केंद्रावर आणण्यात येणार आहे. लस दिल्यानंतर पुन्हा त्यांना शाळेत सोडण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच इतर खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना देखील कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी किंवा आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घ्यावी असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्रावर गर्दी न करण्याचे आवाहन
दरम्यान मुंबई महापालिकेच्या वतीने 9 केंद्रांवर सुरुवातीच्या टप्प्यात लहान मुलांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच लस घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला अर्धा तास वैद्यकीय तज्ज्ञाच्या निगराणीत ठेवण्यात येणार असून, त्याला काही त्रास जाणवल्यास त्याच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अशी माहिती मुंबई आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच मुलांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने पालकांना करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
Prasad Lad : झोपेतच अंगठा मोडला! प्रसाद लाड यांच्यासोबत झोपेत नेमकं झालं तरी काय?
Video | Lockdownशिवाय पर्याय नाही? गर्दी कमी होईना! चिंता वाढवणारी बातमी