पाण्यासाठी तडफड, महिला श्रीसेवक बेशुद्धावस्थेत, चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती, भयानक व्हिडीओ समोर
महाराष्ट्र भूषण पूरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडत होता तेव्हा घटनास्थळी जमलेल्या गर्दीतील परिस्थिती किती भयानक होती, अनेक माणसं, महिला कशा बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडल्या होत्या हे वास्तव दर्शवणारे काही धक्कादायक व्हिडीओ आता समोर आले आहेत.
नवी मुंबई : महाराष्ट्र सरकारने तब्बल 13 कोटी रुपये खर्च करुन नवी मुंबईच्या खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं. भर उन्हात ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रधान सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी लाखो श्रीसेवकांची गर्दी जमलेली होती. हे सर्व श्रीसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर असलेल्या प्रेमाखातर त्या कार्यक्रमाला हजर राहिले. पण या श्रीसेवकांसोबत काय घडलं हे संपूर्ण महाराष्ट्राने कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं. या कार्यक्रमात हजर राहिलेल्या तब्बल 14 श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. विशेष म्हणजे श्रीसेवकांच्या गैरसोयीचे धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या 50 ते 60 श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. या उष्माघाताने आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय. हा आकडा खरंतर शासनाकडून अधिकृत जारी करण्यात आलेला आकडा आहे. अजूनही अनेक जणांवर उपचार सुरु आहेत. संबंधित कार्यक्रम पार पडत होता तेव्हा घटनास्थळावरील परिस्थिती किती भयानक होती, अनेक माणसं, महिला कशा बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडल्या होत्या हे वास्तव दर्शवणारे काही धक्कादायक व्हिडीओ आता समोर आले आहेत. हा व्हिडीओमधून राज्य सरकारचं 13 कोटी खर्च करुनही नियोजन किती गंडलं हे सिद्ध करत आहे.
उन्हामुळे जे लोकं अस्वस्थ झाले होते त्यांना गर्दीमुळे बाहेर काढणं अवघड झालं होतं, असं व्हिडीओत दिसतंय. संबंधित घटना ही चेंगराचेंगरीमुळे तर झाली नाही ना? असाही प्रश्न उपस्थित होतोय. कारण काही महिला बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडलेल्या या व्हिडीओत बघायला मिळत आहेत. तर त्यांच्यावर काहीजण पडताना दिसत आहेत. चेंगराचेंगरी साखरी परिस्थिती निर्माण होते की काय? असं त्या व्हिडीओत बघायला मिळतंय. तसेच जवळच रग्णवाहिका आहे. पण तरीही गर्दी इतकी असते की ज्यांची प्रकृती बिघडली आहे त्यांना रुग्णालयात घेऊन जाता येत नाही. अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार होता.
संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा उभा राहिल, असे ते दृश्य आहेत. अनेक महिला जमिनीवर निपचित पडल्या आहेत. त्या जीवंत आहेत की मृतावस्थेत हे व्हिडीओतून समजू शकत नाही. पण काही स्वयंसेवक या श्रीसेवकांना वाचवण्यासाठी सीपीआर करताना दिसत आहेत. सीपीआर म्हणजे रुग्णाला वाचवण्यासाठी छातीवर दाब टाकला जातो. तसंच काहीसं गर्दीतील स्वयंसेवक श्रीसेवकांना वाचवण्यासाठी करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहेत. पण संपूर्ण प्रकार हा भयानक आहे.
अतुल लोंढे यांची सरकारवर टीका
दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या घटनेवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. आघाडी सरकारने 2008 मध्ये नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी इतकेच लोकं आले होते. पण आघाडी सरकारने त्यावेळेस श्रीसेवकांशी बोलून कार्यक्रम आयोजित केला होता. रुग्णवाहिकेला कसं जाता येईल, श्रीसेवकांना पाणी आणि इतर सुविधा कशा मिळतील याबाबत नियोजन करण्यात आलेलं. तो कार्यक्रम व्यवस्थित झाला होता. पण शिंदे सरकारने हा कार्यक्रम लादला, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.
“या सरकारने एका इव्हेंट कंपनीला एका दिवसात टेंडर दिलं. ती कोणती कंपनी आहे? याबाबत चौकशी व्हायला हवं. लोकांना पाणी कसं मिळालं नाही? याबाबत चौकशी व्हायला हवी. हे अतिशय निष्काळजीपणे आणि बेजबाबदारपणे केलेलं काम आहे. यांना लोकांच्या जीवाशी काही देणंघेणं नाही”, अशी टीका अतुल लोंढे यांनी केलीय.