राहुल नार्वेकर यांचे आव्हान…टीका करण्याऐवजी निर्णयातील चुका दाखवा
Rahul Narvekar | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय दिला. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. परंतु नार्वेकर यांनी शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवले नाही. त्यामुळे अजित पवार गटाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई, दि. 22 फेब्रुवारी 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासंदर्भात निर्णय दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांना लक्ष केले जात आहे. राहुल नार्वेकर हे नवीन घटनाकर आहे, अशी टीका काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केली होती. या प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी पलटवार केला आहे. आपण घेतलेले निर्णय कायदेशीर आहे. माझ्यासमोर आलेल्या पुराव्यावरुन हा निर्णय घेतला आहे. माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या निर्णयातील चुका दाखवा, असे आव्हान राहुल नार्वेकर यांनी दिले आहे.
काय म्हणाले नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले की, एखाद्या संस्थेने आपल्या विरोधात निर्णय दिला तर त्यावर टीका करायची, अशी त्यांची कायमची भूमिका आहे. संस्थेने बाजूने निर्णय दिला तर सत्याचा विजय झाल्याचे सांगत आनंद साजरा करतात. ते सातत्याने आपल्या निर्णयावर टीका करत आहेत. परंतु मी घेतलेला निर्णय कायदेशीर आहे. विरोधकांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा माझा निर्णय चुकीचा कसा हे दाखवा, असे आव्हान नार्वेकर यांनी दिले.
उच्च न्यायालयाकडून नोटीस
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय दिला. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. परंतु नार्वेकर यांनी शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवले नाही. त्यामुळे अजित पवार गटाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस दिली आहे. या याचिकेवर आता 14 मार्चला सुनावणी होणार आहे. त्यावेळी राहुल नार्वेकर यांना या निर्णयाबाबत खुलासा द्यावा लागणार आहे.
उच्च न्यायालयात अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यामूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अजित पवार गटाकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी काम पाहत आहेत.