मोठी बातमी ! नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल; विजय वडेट्टीवार यांनी बॉम्बच टाकला
आता कॅगच्या अहवालातून जे समोर आलं आहे ते सर्वांसमोर आहे. काँग्रेसला तेव्हा कोल स्कॅम, स्पेक्ट्रम स्कॅमवरून बदनाम केलं. त्यामुळे भाजपची सत्ता आली. आता कॅगनेही घोटाळे उघड केले आहेत. आता भाजप काय भूमिका घेणार ते पाहू.
मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : कॅगच्या अहवालात केंद्रातील सहा योजनांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. सरकारच्या सहा योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर अधिक ताशेरे ओढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मुद्द्यावर भाष्य करावं, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तर, नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल आला असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
नितीन गडकरींचा काटा काढायचा आहे. हे अंतर्गत राजकारण आहे. कदाचित त्यामागची पार्श्वभूमी असू शकते. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार असताना कॅगने फक्त गडकरींच्या खात्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यावरून सर्व काही स्पष्ट होतं. गडकरींची प्रतिमा स्वच्छ आहे. विकासाची आहे. त्यातून त्यांना साईड ट्रॅक करायचं. त्यांचं राजकारण संपवायचं हा डाव असू शकतो, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी
कॅगमध्ये गडकरींच्या खात्यांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. पण पंतप्रधान हे रस्ते समितीचे अध्यक्ष असतात. मग पंतप्रधानांची भूमिक काय हा प्रश्न उपस्थित होतो. केंद्रात मोठा भ्रष्टाचार आहे. आता जे आलं त्यावर केंद्र सरकार काय कारवाई करेल हे पाहणार आहोत, असंही ते म्हणाले.
तर देशाला धोका होईल
मतदारांनी सरकार विरोधात राग व्यक्त केला पाहिजे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मतपेटीतून राग यायला मतपेटी सुरक्षित आहे का? काल बावनकुळे म्हणाले बटन दाबण्यासाठी जातील तेव्हा मत भाजपलाच मिळेल. एवढा आत्मविश्वास येतो कुठून? महागाई वाढली आहे. सीएनजी वाढला आहे. बेरोजगारी आहे. सामान्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे कमळाचं बटन कोणी दाबेलच कसं? म्हणजे यात काही तरी गोलमाल आहे. पुन्हा कमळालाच मतदान जात असेल तर देशाला धोका होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
अशी 40 उदाहरणं आहेत
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका आमदाराची बायको आत्महत्या करणार होती म्हणून त्याला मंत्रिमंडळात घेतलं. एक राजीनामा देत होता म्हणून त्याला मंत्री केलं. दुसऱ्याला राणेंची भीती वाटत होती म्हणून त्याला मंत्रीपद दिलं. आता हे तीन उदाहरणं आहेत. अशी चाळीस आमदारांचीही उदाहरणं असू शकतात. त्यामुळे घेणार कुणाला आणि काढणार कुणाला असा प्रकार आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
रामदेव बाबा साधू संत थोडीच आहे
रामदेव बाबांचे 14 कोटी रुपये माफ केले. रामदेव बाबा आता साधू संत थोडीच राहिले आहेत. त्यांनी जागा घेतली. त्यांना कर माफ केला. उगाच सरकारने कर माफ केला नाही. तिजोरी अशाच लोकांवर खाली केली जात आहे. मंत्री त्यांचेच आहेत. त्यांच्यासाठी तिजोरी खुली करणार नाही तर काय? आता भाजपच्या वाट्याला काय मिळणार माहीत नाही. पण हे चाळीस दुणे ऐंशी हे टपूनच बसले आहेत. जेवढं मिळेल तेवढं ओरबडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.