कोण आहेत निहार ठाकरे?; सध्या काय करतात?; आदित्य ठाकरे यांना घरातीलच आव्हान त्रासदायक ठरणार?
निहार यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये इंटनॅशनल कमर्शियल लिटिगेशनचा कोर्स केला आहे. त्यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजातून एलएलबीची डिग्री घेतली आहे.
मुंबई: पुढच्यावर्षी होणारी विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे. शिवसेनेत पडलेली फूट, वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाशी झालेली युती, संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटाला साथ या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय निकाल लागतो आणि कुणाचा निक्काल लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आदित्य ठाकरे यांना घरातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात त्यांचे चुलत बंधू निहार ठाकरे यांना मैदानात उतरवण्याची खेळी शिंदे गटाकडून खेळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची मोठी डोकेदुखी वाढणार आहे. निहार ठाकरे हे राजकारणात नवखे आहेत. त्यांचं अचानक नाव पुढे आल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांना पाठिंबा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. निहार यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतरच निहार ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
कोण आहेत निहार?
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव बिंदूमाधव ठाकरे यांचे निहार हे चिरंजीव आहेत. बिंदुमाधव यांचा 1996मध्ये अपघातात मृत्यू झाला होता. निहार ठाकरे आतापर्यंत राजकारणापासून दूर होते.
भाजप नेत्याचे जावई
निहार ठाकरे हे भाजप नेत्याचे जावई आहेत. भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येशी निहार यांचा विवाह झाला आहे.
प्रसिद्ध वकील
निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत. मुंबई उच्च न्यायालयात ते प्रॅक्टिस करतात. निहार हे राजकीय कायदेशीर सल्लागार, कार्पोरेट व्यवहाराच्या कागदपत्रांची ड्राफ्टिंग करणे, देशांतर्गत आणि बहुराष्ट्रीय कार्पोरेट ग्राहकांमध्ये तडजोडी करणे आदी कामे ते करतात. ते दिवाणी संहिता 2016 (आयबीसी)अंतर्गत दिवाणी खटले, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मध्यस्थता तसेच कार्यवाहिची प्रॅक्टिस करतात.
परदेशात शिक्षण
निहार यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये इंटनॅशनल कमर्शियल लिटिगेशनचा कोर्स केला आहे. त्यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजातून एलएलबीची डिग्री घेतली आहे. निहार यांचं भाजपशी खास कनेक्शन आहे.
निहार यांच्या बहिणीचं नाव नेहा ठाकरे आहे. येत्या काळात निहार यांची महाराष्ट्रातील राजकारणात ग्रँड एन्ट्री होऊ शकते. त्यामुळे केवळ आदित्य ठाकरेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.