Mumbai : वरळी सिलेंडर स्फोटातील आणखी एकाचा मृत्यू, आतापर्यंत मृतांची संख्या दोनवर
वरळीतील बीडीडी चाळीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. त्यात आधी एकाचा मृत्यू झाला होता, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : 30 नोव्हेंबर राजी वरळीतील बीडीडी चाळीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. त्यात आधी एकाचा मृत्यू झाला होता, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. या स्फोटात एकूण चारजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील दोघांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. दिवसेंदिवस मुंबईत सिलेंडर स्फोटांच्या घटनेत वाढ होत चालली आहे.
स्फोटात 4 महिन्याच्या बाळाचाही मृत्यू
या स्फोटात याआधी एका चार महिन्याच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचा सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला आहे. आनंद पुरी असं आज मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यावरून भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. काल भाजप नगरसेवकांनी महापालिकेतही जोरदार घोषणाबाजी केली. नायर रुग्णालयात तातडीने उपचार न करता जखमींना ताटकळत ठेवल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
72 तासानंतर महापौर रुग्णांच्या भेटीला पोहोचतात
मुंबईच्या महापौर 72 तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. यावर भाजप नेते आशीष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढा वेळ मुंबईच्या महापौर कुठे निजल्या होता, त्यांना या घटनेची जराही खबर नव्हती का, असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केला. शिवाय युवराज तर हवेतच असतात, असा घणाघात त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे. पेंग्विनसाठी महापालिका रोज दीड लाख रुपये खर्च करते, मात्र चार महिन्याच्या बाळासाठी 45 मिनिटे नाहीत का? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला आहे. त्यामुळे हे प्रकरण तापलं आहे.