Yes Bank Fraud: मुंबई-पुण्यात सीबीआयची छापेमारी, विनोद गोयंका, अविनाश भोसले आणि शाहिद बलवा यांच्या घर आणि कार्यालयांवर धाडी
Yes Bank Fraud: आज सकाळीच सीबीआयने विनोद गोयंका आणि शाहिद बलवा यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे.
मुंबई: येस बँकेतील (Yes Bank Fraud) घोटाळ्याप्रकरणी सीबीआय (cbi) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज मुंबई (mumbai) आणि पुण्यात धाडी मारल्या. आज सकाळीच सीबीआयने विनोद गोयंका आणि शाहिद बलवा यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई, पुण्यात 8 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. पुण्यातील बिल्डर विनोद गोयंका, मुंबईत शाहिद बलवा यांच्यासह अविनाश भोसले यांचं घर आणि कार्यालयात अजूनही छापेमारी सुरू असून अनेक कागदपत्रे पाहिले जात आहेत. या ठिकाणी कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये. या तिघांच्याही घर आणि कार्यालयाच्या बाहेर जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
येस बँक डीएचएफएल घोटाळ्या प्रकरणी ही चौकशी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणी सीबीआयने प्रसिद्ध बिल्डर संजय छाबडिया यांना अटक केली आहे.येस बँक आणि डीएसएफएलच्या फसवणूक प्रकरणात सीबीआय व्यक्तिरिक्त ईडीही तपास करत आहे. येस बँकचे संस्थापक राणा कपूर यांनी पदाचा दुरुपयोग करून डीएसएफएलला फायदा पोहोचवल्याचं हे प्रकरण आहे.
राणा आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैयक्तिक लाभ
दरम्यान, येस बँकेने डीएचएफएलच्या डिबेंचरमध्ये सुमारे 3700 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्याबदल्यात राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैयक्तिक लाभ देण्यात आल्याचा आरोप आहे. सीबीआयने या प्रकरणी मार्च 2020मध्ये गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने फसवणूक आणि गुन्हेगारी षडयंत्र रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात भ्रष्टाचाराचीही चौकशी केली जात आहे.
6500 कोटी रुपयांचा घोटाळा
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी हाउसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) कंपनीचे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान हे मुख्य आरोपी आहेत. त्यांनी तब्बल 6500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी मागील काही दिवसांपासून YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्यामागेही चौकशीचा ससेमीरा सुरु आहे. येस बँकेमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राणा कपूर यांचा संपूर्ण परिवार संशयाच्या भोवऱ्यात आहे. राणा कपूर यांची पत्नी बिन्दू कपूर, त्यांच्या तीन मुली राखी, रोशनी आणि राधा यांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. बेकायदेशीर क४ज मिळूवन देण्याच्या बदल्यात राणा कपूर यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलींना लाच देण्यात आल्याचा आरोप आहे.