सुनील केदार यांच्या अडचणी वाढणार, कारण जेलमध्ये जहाल नक्षलवादी अन् दहशतवादी असताना…
Sunil Kedar | नागपूर सेंट्रल जेलमध्ये अनेक जहाल नक्षलवादी आणि काही दहशतवादी कैदेत आहे. परंतु सुनील केदार यांची कारागृहामधून सुटका होताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जेलच्या समोरील परिसरात गर्दी केली. हा मुद्दा त्यांना अडचणीत आणणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुनील ढगे, नागपूर, दि. 11 जानेवारी 2024 | नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना जामीन मंजूर करण्यात आला. नागपूरच्या प्रथम श्रेणी न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना जामीन केला. जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची जेलमधून सुटका झाली. त्यावेळी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी जेलच्या समोर मोठी गर्दी केली. टायगर इज बॅक अशा प्रकारे हातात होर्डिंग घेऊन कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. नागपूर कारागृहात अनेक गंभीर गुन्ह्यातील कैदी, नक्षलवादी, आतंकवादी आहेत. त्यामुळे हा प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यानंतर केदार समर्थकांनी गर्दी करत पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केले.
पोलिसांचा अहवाल केदार यांच्या अडचणी वाढवणार
सुनील केदार यांच्या अडचणी पोलिसांच्या अहवालामुळे वाढू शकतात. नागपूर पोलिसांनी सुनील केदार यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या रॅलीत सहभागी असेलल्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आता पोलीस या गुन्ह्याबाबतचा अहवाल संबंधीत न्यायालयाच्या लक्षात आणून देणार आहेत. गर्दी करत घोषणाबाजी करणे केदार यांना अडचणीत आणणार आहे.
कारागृह परिसर संवदेनशील त्यानंतरही…
नागपूर सेंट्रल जेलमध्ये अनेक जहाल नक्षलवादी आणि काही दहशतवादी कैदेत आहे. परंतु सुनील केदार यांची कारागृहामधून सुटका होताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जेलच्या समोरील परिसरात गर्दी केली. पोलिसांनी एक दिवस आधीच सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी गर्दी करण्यात येऊ नये, अशी सूचना दिली होती. तरी देखील गर्दी करून घोषणाबाजी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जेल परिसर संवेदनशील असून त्या ठिकाणी असे कृत्य करण्यात येऊ नये, असे सांगूनही केदारांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी करत घोषणाबाजी केली असे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.
काही कार केल्या जप्त
केदार जेलमधून बाहेर येताच कारच्या सनरूफमधून बाहेर निघून कार्यकर्त्यांना जेल समोरच अभिवादन करत होते. त्या ठिकाणीच कार्यकर्त्यांनी त्यांची कार थांबून त्यांना हार घातले. हा सर्व तपशील पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदवला आहे. तसेच रॅलीमध्ये सहभागी असलेल्या 20 पेक्षा जास्त चार चाकी वाहनांचे नंबरही पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे. यातील काही कार जप्त करण्यात आल्या आहे.