Bhandara News : तर जीवाचं बरं वाईट झालं असतं… मृतदेह सोडून पळाले; 1 मिनिटात स्मशानभूमीत शुकशुकाट
वेळ आली होती, पण काळ आला नव्हता, अशी म्हणण्याची वेळ भंडाऱ्यातील हरदोली गावातील लोकांवर आली आहे. येथील गावात अंत्यसंस्कार सुरू असताना असं काही घडलं की लोकांना मृतदेह सोडून बाहेर पळावं लागलं, असं काय घडलं त्या स्मशानभूमीत?

तेजस माथुरे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, भंडारा | 11 ऑक्टोबर 2023 : आपल्या जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीचं निधन झालं तर सर्वजण त्याला अखेरचा निरोप द्यायला जातात. त्यांच्या कुटुंबीयाच्या दु:खात सहभागी होऊन त्यांचं सांत्वन करणं हा त्यामागचा हेतू असतो. मग रात्री अपरात्री कधीही कुणाच्या मृत्यूची बातमी आली तर लोक कामधंदा सोडून नातेवाईकांच्या घरी जातात आणि अंत्ययात्रेत सामील होतात. शेवटचा अग्नी देईपर्यंत नातेवाईक मित्र मंडळी स्मशानभूमीत थांबलेले असतात. साश्रू नयनाने प्रिय व्यक्तीला निरोप दिल्यानंतर ते घराकडे जायला निघतात. पण एका गावात भलताच प्रकार घडला. भंडाऱ्यातील एका गावात अंत्ययात्रेला आलेले लोक मृतदेह सोडूनच पळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काय घडलं त्या गावात असं?
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील हरदोली/झंझाळ या गावात ही धक्कादायक घटना घडली. या गावातील मोराती कबल गायधने यांचं वयाच्या 69व्या वर्षी निधन झालं होतं. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक, गावकरी आणि पंचक्रोशीतील मित्र परिवार आला होता. गायधने यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी जमली होती. हरदोली येथील त्यांच्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातीलच स्मशानभूमीत ही अंत्ययात्रा नेण्यात आली. त्यानंतर रितीरिवाजा प्रमाणे अंत्यसंस्काराचा विधी सुरू झाला. सर्वजण शोकाकूल वातावरणात या विधीत सामील झाले होते. अत्यंत शांततेत हा कार्यक्रम सुरू होता. विधीनंतर मृतदेहाला अग्नी देण्यात आला. त्यामुळे धूर निर्माण झाला अन् इतक्यात अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांचा हल्ला होताच अंत्ययात्रेला आलेले लोक भयभीत झाले.
वाट दिसेल तिकडे धावत सुटले
मोठ्या प्रमाणावर मधमाशांनी हल्ला सुरू केल्याने सर्वचजण घाबरले. त्यामुळे मृतदेह स्मशानभूमीतच सोडून सर्वच लोक तिथून पळाले. जो तो जीव मुठीत घेऊन पळत होता. दिसेल तिकडे लोक सैरावैरा धावत होते. कुणी शेतात पळाले, तर कुणी गावाच्या दिशेने, कुणी झाडावर चढलं. तर कुणी पाण्याच्या दिशेने पळाले. जीव वाचवण्यासाठी लोक नुसते धावतच होते. अवघ्या मिनिटभरात स्मशानभूमीत शुकशुकाट पसरला होता. या धावपळीत अनेकजण पडले. अनेकांना मुक्का मार लागला. मधमाशांचा हल्ल्यात 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले.
धुरामुळे मधमाशांचा हल्ला
दरम्यान, स्मशानभूमीच्या बाजूला असंख्य झाडी आहेत. या झाडांवर मधमाशांची पोळं आहेत. मृतदेहाला अग्नी देताच जाळ आणि धूर निर्माण झाला. धुराचे लोट सर्वत्र पसरले. त्यामुळे मधमाशाही पोळावरून उठल्या आणि त्यांनी स्मशानभूमीतील नागरिकांवर हल्ला केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.