नागपूर खंडपीठाचे न्यायामूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टातच राजीनामा; कोर्ट रूममध्ये काय घडलं?
न्यायामूर्ती रोहित देव यांनी नक्षलवाद्यांशी संबंध असलेले प्रा. जीएन साईबाबा यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यांच्या या निर्णयानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
नागपूर | 4 जुलै 2023 : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायामूर्ती रोहित देव यांनी भर कोर्टातच राजीनामा दिला आहे. देव यांनी कोर्टातच राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे रोहित देव यांच्या निवृत्तीला एक वर्ष बाकी होतं. त्यापूर्वीच त्यांनी कोर्टात राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यांची ही घोषणा ऐकून उपस्थित वकील आणि कोर्टाचे कर्मचारीही अवाक झाले होते. त्यानंतर कोर्ट परिसरात केवळ देव यांच्या राजीनाम्याचीच चर्चा सुरू होती.
सकाळी कोर्ट सुरू झाल्यानंतर न्यायामूर्ती रोहित देव यांनी कोर्टाचे कामकाज पाहिले. सर्वा कामकाज नियमितपणे हाताळल्यानंतर त्यांनी कोर्ट रूममध्येच न्यायामूर्तीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. आणि काही न बोलता ते कोर्टातून निघून गेले. देव यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
सर्वांकडे दिलगिरी
यावेळी त्यांनी सर्वांकडे दिलगिरीही व्यक्त केली. मी उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या वागण्यामुळे कुणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगीर आहे. मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. सेवेतून मुक्त होत आहे, असं रोहित देव यांनी राजीनामा देताना सांगितलं. वकिलांनी कठोर मेहनत करत राहावी, असा सल्ला देतानाच काही प्रसंगी मी तुमच्यासोबत कठोर वागलो, त्याबद्दल दिलगीर आहे, असंही ते म्हणाले.
मी प्रत्येकाचीच माफी मागतो. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची. कधी कधी मी तुमच्यावर ओरडलो. त्यामागचं कारण म्हणजे तुमच्यात सुधारणा व्हावी. तुम्हाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. कारण तुम्ही मला कुटुंबासारखे आहात. पण तुम्हाला सांगायला खेद वाटतो की मा राजीनामा देत आहे. माझ्या आत्मसन्मानाच्या विरोधात मी काम करू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं.
सर्वांना आश्चर्य
न्यायामूर्ती रोहित देव यांनी नक्षलवाद्यांशी संबंध असलेले प्रा. जीएन साईबाबा यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यांच्या या निर्णयानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा निर्णय फिरवून साईबाबा यांना दोषी ठरवलं होतं. देव यांच्या राजीनाम्या मागे हेही एक कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, देव किंवा इतर कुणीही त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण सांगितलेलं नाही. विशेष म्हणजे देव यांच्या निवृत्तीला एक वर्ष बाकी असताना त्यांनी असा तडकाफडकी निर्णय कसा घेतला? याचचं आश्चर्य सर्वांना वाटत आहे.
कोण आहेत न्यायामूर्ती देव
न्यायामूर्ती देव यांची मुंबई हायकोर्टात 5 जून 2017 रोजी अॅडिशनल जज म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर 12 एप्रिल 2019मध्ये त्यांची जज म्हणून कायमस्वरुपी नियुक्ती झाली होती. ते 4 डिसेंबर 2025मध्ये निवृत्त होणार होते.