दाढी मिशाधारी पुरुष बुरखा घालून महिला डॉक्टरच्या वेशात फिरतोय; दाढीवाल्या इसमाचं गूढ वाढलं
नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात बुरखा घालून महिला डॉक्टरच्या वेषात एक इसम फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून तो रुग्णालयात फिरत होता.
नागपूर : नागपूरमध्ये सध्या एका दाढीवाल्या बुरखाधारी व्यक्तीची दहशत निर्माण झाली आहे. हा दाढी मिशाधारी पुरुष बुरखा घालून महिला डॉक्टरच्या वेशात फिरत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नागपूरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात महिलांचा बुरखा आणि अप्रोन घालून हा इसम फिरत होता. त्याची माहिती मिळताच सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. मागील 15 दिवसापासून तो या वेशात रुग्णालय परिसरात फिरत होता. या प्रकरणाने रुग्णालयात खळबळ उडाली असून बुरखा घालून रुग्णालयात फिरण्यामागे त्याचा काय उद्देश होता याचा तपास पोलीस करत आहे.
मेयो सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्तव्यावर असलेल्या एमएसएफ जवानाला बुरखा आणि त्यावर अप्रोण घातलेल्या महिलेवर संशय आल्याने सुरक्षा रक्षकांनी त्याला थांबविले. त्याच्याकडे रुग्णालयाच्या आयकार्डची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सोबतच बोलताना बाईचा आवाज काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरक्षारक्षकांचा संशय आणखी बळावला. त्यांनी अधिक चौकशी केली असता महिलेचा बुरखा काढल्यावर आत दाढीमिशी असलेला तरुण दिसून आला. जावेद शेख शफी शेख असे आरोपीचे नाव आहे. चोरीच्या उद्देशाने की आणखी कोणत्या उद्देशाने वेषांतर करून तो रुग्णालयात फिरत होता याचा तपास तहसील पोलीस करत आहे.
15 दिवसांपासून फिरत होता
कसून चौकशी केली असता हा इसम गेल्या 15 दिवसांपासून रुग्णालयात फिरत असल्याचं आढळून आलं आहे. नवीनच बुरखाधारी महिला डॉक्टर ही वार्ड तसेच रुग्णालय परिसरात फिरताना दिसून आलीय. तिच्या हालचालीही संशयास्पद वाटल्यानंतर तिला हटकल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. जेव्हा तहसील पोलिसांनी त्या महिलेला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली तेव्हा मात्र वेगळाच प्रकार समोर आला. यावेळी ती बुरखाधारी महिला नसून तरुण होता.
तीन मोबाईल जप्त
जावेद शेख हा ताजबागमागे राहतो. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळून तीन मोबाईल जप्त करण्यात आले. हे मोबाईल चोरीचे आहेत काय? त्याने ते कुठून आणले? याचा तपास करण्यात येत आहे. तसेच तो रुग्णालयात वेषांतर करून येण्यामागचे कारणही शोधण्यात येत असल्याचं पोलीस निरीक्षक विनायक घोले यांनी सांगितलं. तसेच मुलं चोरण्यासाठी तर हा तरुण रुग्णालयात येत नव्हता ना? याचाही तपास करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सुरक्षेवर प्रश्न
दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून जावेद हा बुरखा घालून फिरत होता. विशेष म्हणजे तो महिला डॉक्टर म्हणून फिरत होता. तरीही कुणाच्या लक्षात आलं नाही. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच बुरख्यात महिला डॉक्टर बनून एक पुरुष फिरत असूनही डॉक्टरांनाही तिच्यावर संशय आला नसल्यानेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.