Nana Patole : उद्धव ठाकरे यांची ‘ती’ खुर्ची जाणार, वज्रमूठ सभेचं नियोजन काय?; नाना पटोले यांनी दिली मोठी माहिती
कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप सोबत गेलेल्या काग्रेस नेत्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे. कितीही मोठा नेता असेल तरी त्याच्यावर कारवाई होणार. आम्ही पत्र काढलंय. कुणासोबत युती करायची आणि कुणाशी नाही याचे काही नियम आहेत, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
नागपूर : नागपूर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. महाविकास आघाडीची ही नागपुरातील पहिलीच सभा आहे. या सभेला प्रचंड गर्दी होणार आहे. मात्र, या सभेत उद्धव ठाकरे यांना विशेष आणि मोठी खुर्ची देण्यात येणार नाहीये. संभाजीनगरात उद्धव ठाकरे यांना मोठी खुर्ची देण्यात आली होती. इतरांपेक्षा ही वेगळी खुर्ची देण्यात आली होती. त्यामुळे आघाडीतील नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे आता नागपूरच्या सभेत ही दुरुस्ती करण्यात येणार आहे. इतर नेत्यांनी जी खुर्ची असेल तीच उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
नागपूरातील वज्रमुठ सभेत सर्वांच्या खुर्च्या सारख्या असतील. उद्धव ठाकरे यांना जी खुर्ची असेल तीच खुर्ची सर्वांना असेल. सभेत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांची भाषणं होणार आहेत. काही लोक कर्नाटकात गेले आहेत. सर्वच नेते येतील असं नाही. आमचे प्रमुख नेते येतील. मला सुरतला जायचं होतं म्हणून मी संभाजीनगरच्या सभेला गेलो नव्हतो. उद्याच्या सभेत मी जाणार आहे. नागपुरातील वज्रमुठ सभा जोरात हेणार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
राऊतांवर हल्लाबोल
नागपूरच्या विकासबाबत संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याला नाना पटोले यांनी सनसनाटी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी फार बोलत नाही हे सर्वांना माहीत आहे. नागपूरच्या लोकांना काय अडचणी आहेत, किती कर लावलेय याबाबत संजय राऊत यांनी बोलावं. नागपुरात लुट सूरू आहे, हे संजय राऊत यांनी तपासावे मग विकास कळेल. नागपूर किती महागडं शहर आहे, हे संजय राऊत यांनी आधी पहावं. तेव्हा कळेल विकास झाला की नाही, असा टोला पटोले यांनी लगावला.
पटोले यांनी दम भरला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला होता. नाना पटोले यांनी बावनकुळे यांचा हा इशारा उडवून लावला आहे. राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यावर भाजपने विरोध केल्यास आम्ही देशाचं तसं उत्तर देऊ. राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लागला तर यांची काय हालत होणार हे त्यांनी बघावं, असा सज्जड दमच पटोले यांनी भरला आहे.
शिवाणी यांचं समर्थन
शिवाणी वडेट्टीवार यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेलं वक्तव्य हे सावरकरांच्याच पुस्तकातलं आहे, असं सांगत पटोले यांनी शिवाणी यांचं समर्थन केलं आहे. कुणाला कुणी आदर्श मानावं हे त्यांनी ठरवावं. प्रत्येकाचा कोणी ना कोणी आदर्श असतोच, असंही त्यांनी सांगितलं.
एकही आमदार फुटणार नाही
राष्ट्रीय पातळीवरच्या चर्चांसाठी शरद पवार आणि राहुल गांधी भेटले असतील तर त्यात काही गैर नाही. राज्यांमधील चर्चा असतात तेव्हा मी त्यात असतो. पुढील निवडणूका तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. फोडाफोडीचं राजकारण फार काळ टीकत नाही. आमचा कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.