आता राज्यात वीज निर्मिती केंद्र तिथे जैवविविधता उद्याने, ऊर्जा मंत्र्याची मोठी घोषणा
राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्यानांची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
अकोला: राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्यानांची (garden) निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी केली आहे. तसेच या संदर्भात प्रकल्प अहवाल पाठवण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. प्रदूषण तसेच अन्य पर्यावरणीय समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून पारस सह राज्यातील सर्व वीज निर्मिती केंद्रांच्या (power generator plant) परिसरात उद्यानांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं. पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे आज डॉ.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अकोला आणि वाशीम या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या निर्णयामुळे राज्यातील औष्णिक, जल,वायू आणि सौर ऊर्जा प्रकल्पात भविष्यात जैव विविधता उद्यान निर्माण होणार आहे.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महावितरणचे अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, महापारेषणचे अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता बी.टी. राऊत, महानिर्मितीचे पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याबैठकीत अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. निर्मिती, पारेषण, वितरण आणि महाऊर्जा या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.
कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ग्रंथालये उभारा
“वीज निर्मिती प्रकल्पांच्या परिसरात प्रदूषण व अन्य पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना म्हणून जैवविविधता उद्यानांची निर्मिती करावी. त्यासाठी पर्यावरण शास्त्र तज्ज्ञाकडून प्रकल्प अहवाल तयार करून घ्यावा. वीज निर्मिती दरम्यान उत्सर्जन होणाऱ्या रासायनिक घटकांचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन त्यास अनुकूल अशा वनस्पतींची लागवड करण्यात यावी. वृक्ष लागवड तसेच सौर ऊर्जेचा वापर याबाबींचा समावेश त्यात करून जैव विविधता उद्यान व सौर ऊर्जा प्रकल्प एकत्र उभारता येईल का,याची चाचपणी करावी “, अशा सूचना राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सविस्तर प्रकल्प अहवालासह या विषयावर प्रस्ताव पाठवावा, असे त्यांनी सांगितले. त्याच प्रमाणे कर्मचारी वसाहतींच्या परिसरात कर्मचाऱ्यांची मुले-मुली यांच्यासाठी अद्ययावत ग्रंथालय उभारावे. त्यात विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
थकबाकी वसुलीसाठी बांधावर जा
थकबाकी वसुलीसाठी बांधावर जा, वीज निर्मितीसाठी आवश्यक कोळशाची उपलब्धता ठेवण्याबाबत दक्ष रहा, असेही त्यांनी सांगितले. महावितरणने थकबाकी वसुलीसाठी गावोगावी जाऊन शेतकरी तसेच अन्य ग्राहकांना विविध योजनांचे स्वरूप समजावून सांगावे, अशी महत्वपूर्ण सूचना त्यांनी केली. यात उत्कृष्ट प्रचार-प्रसाराचे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
वीज पुरवठा खंडित होण्याची कारणं शोधा
महापारेषणने उन्हाळ्याच्या काळात ज्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो, अशा तांत्रिक कारणांची माहिती अद्ययावत करून ठेवा. जेणेकरून आपत्तीच्या काळात उपाययोजना करता येणे शक्य होईल. त्यानंतर त्यांनी रोहित्र क्षमता वाढ, उपकेंद्र उभारणी, रिऍक्टर उभारणी आदी बाबींचाही आढावा घेतला.
अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
राज्यातील महानिर्मिती, महापारेषण, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपले ज्ञान अद्ययावत करता यावे यासाठीही त्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच अनुसूचित जाती जमातीच्या ग्राहकांसाठी असणारी डॉ.आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची व्याप्ती ओबीसी घटकांसाठी वाढविणार असल्याचे तसेच वसंतराव नाईक कृषी वीज जोडणी योजनेलाही मुदतवाढ देणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
संबंधित बातम्या:
‘लग्नाचा खरा अर्थ तेव्हा समजतो जेव्हा..’; पतीला कॅन्सर निदान झाल्यानंतर अभिज्ञाची भावूक पोस्ट