नितीन गडकरी पंतप्रधान होणार? भाजपला किती खासदार कमी पडणार?; नाना पटोले यांचं भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोट
राज्यात पाऊस नाही. दुष्काळाची परिस्थिती आहे. सरकारने दुष्काळाच्या परिस्थितीची उपाययोजना करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते मीडियाशी बोलत होते.
वर्धा | 4 सप्टेंबर 2023 : येत्या डिसेंबरमध्ये किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे विरोधकांनी भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन केली हे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचं आव्हान पेलण्यासाठी भाजपला एनडीएचं पुनरुज्जीवन करावं लागलं आहे. गेल्या 9 वर्षापासून भाजपची केंद्रात स्वबळावर सत्ता असूनही भाजपला एनडीएला मजबूत करावं लागत असल्याने आश्चर्य वाटत आहे. भाजप स्वबळावर करिश्मा करू शकत नाही का? अशी चर्चाही या निमित्ताने होऊ लागली आहे. त्याला कारण म्हणजे अनेक सर्व्हेंमध्ये भाजपचं बळ घटताना दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी राहणार की नाही? अशी चर्चाही सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काल वर्धा येथे होते. वर्ध्यातील आर्वीत काँग्रेसची जनसंवाद यात्रा पोहोचली. यावेळी त्यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवत महत्त्वाची माहिती दिली आहे. भाजपने सर्व्हे केला आहे. त्यात त्यांना 50 खासदार कमी पडताना दिसत आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची संधी वाढल्याने नितीन गडरी उभे राहिले आहेत. आता गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भांडणं सुरू झाली आहेत, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
भाजपचा आकडा कमी होईल
नाना पटोले यांनी भाजपमधील अंतर्गत वादाची माहिती देतानाच नितीन गडकरींबाबतचं निरीक्षणही नोंदवलं आहे. पूर्वी गडकरी काय बोलायचे आणि आता काय बोलत आहेत, हे बारकाईने पाहा. पूर्वी गडकरी म्हणायचे तलावात विमान उतरवेल, हवेत बस उडवेन… गडकरी यांच्या अशाच घोषणा होत्या. पण आता संधी दिसताच गडकरी उभे झाले आहेत. 50 खासदार कमी पडले तर मी प्रधानमंत्री बनेल, असं बोलणं सुरू झालंय. त्यामुळे मोदी आणि गडकरी यांचा वाद सुरू झालाय. डिसेंबरमध्ये सर्व्हे होईल तेव्हा भाजपचा आकडा पुन्हा खाली येईल, असा दावा नाना पटोले यांनी केला.
पिंजरा तोडून आलो
आता मशिनबिशिन काही कामी येणार नाही. आपल्या मतविभाजनामुळे आपण हरलो होतो, असंही त्यांनी सांगितलं. लोकशाहीची थट्टा चालवली आहे. केचे यांची गरज संपली. केचे यांना संधी नाही. मी होतो थोडे दिवस तिकडे त्यामुळे मला माहिती आहे. मी त्यांचा पिंजरा तोडून पळून आलो. ताट वाजवू नको, नाही तर दरिद्री येते, असं आई सांगते. यांनी देशाला ताट वाजवायला लावले आणि दरिद्री आली, अशीही टीकाही त्यांनी केली.
मुलाबाळांना मारणारं सरकार
जालन्यात जो लाठीचार्ज झाला तो अमानुष होता. पेटलेला वणवा सरकारने थांबवला पाहिजे नाही तर जनता वणवा पेटवल्याशिवाय राहणार नाही. सरकारने माफी मागितली पाहिजे. राज्यात दुष्काळचे परिस्थिती आहे आणि सरकार शासन आपल्या दारी माध्यमातून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. स्वत;च्या हाताने आपली पाठ थोपटत आहे. हे सरकार मायबाप सरकार नाही हे तर आपल्या मुलाबाळांना मारणार सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.