Nagpur दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी निधी, मोटराइज्ड ट्रायसिकलचंही वाटप, आणखी बरच काही
नागपूर : महापालिकेतर्फे शहरातील दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात मनपाने दिव्यांगांच्या उत्थानासाठी पुढाकार घेतला. विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांग खेळाडूसाठी तसेच दिव्यांगांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी निधी उपलब्ध करून दिला. पात्र दिव्यांगांना मोटराइज्ड ट्रायसिकलसुद्धा देण्यात आलेल्या आहेत. 54 मोटोराइज्ड बॅटरी ट्रायसिकल शहरातील दिव्यांग-अस्थीव्यंग व्यक्तींना कृत्रिम अवयव लावण्यासाठीही नागपूर […]
नागपूर : महापालिकेतर्फे शहरातील दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात मनपाने दिव्यांगांच्या उत्थानासाठी पुढाकार घेतला. विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांग खेळाडूसाठी तसेच दिव्यांगांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी निधी उपलब्ध करून दिला. पात्र दिव्यांगांना मोटराइज्ड ट्रायसिकलसुद्धा देण्यात आलेल्या आहेत.
54 मोटोराइज्ड बॅटरी ट्रायसिकल
शहरातील दिव्यांग-अस्थीव्यंग व्यक्तींना कृत्रिम अवयव लावण्यासाठीही नागपूर मनपानं पुढाकार घेतला. पंडीत दीनदयाल अंत्योदय योजने अंतर्गत कृत्रिम अवयव लावण्यासाठी मोहीम राबविली. शहरातील गरजू व वैद्यकीयदृष्ट्या ज्यांना कृत्रिम अवयव लावण्याची गरज आहे अशांना याचा लाभ देण्यात आला. मनपातर्फे शहरातील इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. यासाठी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांकडून आवेदन मागविण्यात आले आहेत. मनपातर्फे 2021-22 या आर्थिक वर्षात दिव्यांगाकरिता 54 मोटोराइज्ड बॅटरी ट्रायसिकल देण्यात आले.
दिव्यांग खेळाडूंसाठी गुरूगोविंदसिंग स्टेडियम
शहरातील दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी जागा मैदान उपलब्ध नसल्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत महत्वाचा निर्णय महापौर दयाशंकर तिवारी यांनी घेतला होता. उत्तर नागपुरातील गुरूगोविंदसिंग स्टेडियम दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय या स्टेडियममध्ये विविध खेळांचा सराव करणा-या खेळाडूंसाठी आवश्यक साहित्यांची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शहरातील आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक तथा राज्यातील एकमेव अर्जुन क्रीडा पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांचे नाव गुरुगोविंदसिंग स्टेडियममधील जीमला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच राज्य, राष्ट्रीय, पॅरा ऑलिम्पिक, आशियाई, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंना 75 टक्के खर्च दिला जाणार आहे.
दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य
नागपूर शहरातील दिव्यांग खेळाडूंना आपली कामगिरी पार पाडताना येणारी आर्थिक अडचण लक्षात घेण्यात आली. नागपूर महापालिकेनं 2 दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्यसुद्धा केलं. विशेष म्हणजे, दिव्यांग खेळाडूंना सहकार्य करणारी नागपूर मनपा राज्यातील पहिली मनपा ठरली. महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिव्यांगांसाठी विविध योजनांची घोषणा केली होती. त्यामध्ये दिव्यांग खेळाडूंना आर्थिक सहायता करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशाच्या अनुषंगाने मनपाच्या समाजकल्याण विभागातर्फे प्रतिमा बोंडे आणि रोशनी रिंके या दोन्ही एकलव्य राज्य पुरस्कारप्राप्त खेळाडूंना बंगळुरू येथील पॅरावेटलिफ्टींग स्पर्धेसाठी प्रत्येकी 15 हजार रुपयांची आर्थिक सहायता करण्यात आली होती. मनपाच्या या सहकार्याचे चिज करीत प्रतिमा बोंडे यांनी सुवर्णपदक तर रोशनी रिंके यांनी कांस्य पदक पटकावून शहराचे नाव लौकिक केले.