Nana Patole : आझादी गौरव पदयात्रेला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद, उद्या नागपूरच्या पदयात्रेत नाना पटोलेंचा सहभाग
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या 13 ऑगस्ट रोजी नागपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
नागपूर : नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आझादी गौरव पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहभाग घेतला होता. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभर आझादी गौरव पदयात्रा काढली जात आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या, त्याग व बलिदान दिलेल्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला स्मरण केले जात आहे. तर दुसरीकडे भारतीय जता पक्ष मात्र हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचा अवमान करत आहे. चीनमधून हे झेंडे आयात (Import of flags from China) करण्यात आलेले आहेत. या झेंड्याचा आकार व्यवस्थित नाही. मधले चक्र व्यवस्थित नाही तर परभणीमध्ये (Parbhani) तिरंगा झेंड्याबरोबर भाजपाने कमळाचे चिन्ह असलेला झेंडा वाटला. भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही. त्याला ठेच पोहचवण्याचे काम केले. भाजपाला तिरंग्याचे महत्व माहीत नसावे. तिरंगा देशाची शान आहे. करोडो भारतीयांची प्रेरणा आहे. पण भाजपाने (BJP) त्याचा बाजार मांडला आहे. आमचे त्यांना एकच सांगणे आहे की तुम्ही तिरंग्याचा अवमान करू नका, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
हेक्टरी 75 हजार रुपये मदत मिळावी
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे. सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी असून हेक्टरी 75 हजार रुपये मिळावेत ही काँग्रेसची मागणी आहे. नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नियम शिथिल करावेत यासाठी अधिवेशनात आवाज उठवू असेही नाना पटोले म्हणाले. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी नंदूरबार जिल्ह्यातील पदयात्रेत सहभाग घेतला.
नाना पटोले उद्या नागपुरातील पदयात्रेत सहभागी होणार
नाशिकमधील पदयात्रेत नाना पटोले यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, आमदार हिरामण खोसकर, प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश सरचिटणीस व नाशिकचे प्रभारी ब्रिज दत्त, डॉ. हेमलता, प्रदेश सचिव राहुल दिवे, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शाहू खैरे, बबलू खैरे, सोशल मीडियाचे प्रदेश समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या 13 ऑगस्ट रोजी नागपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेत सहभागी होणार आहेत.