अमरावती : राज्य मंत्रिमंडळाचा आजच विस्तार होणार आहे. त्यासाठीची सर्व जय्यत तयारी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना फोन करून मुंबईतच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच आज सकाळी 10 वाजता वर्षावर मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांची एक बैठकही बोलावण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे प्रहारचे आमदार बच्चू कडू हे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. खुद्द बच्चू कडू यांनी येत्या तीन तासात आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगून आपली नाराजी उघड केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना फोन केल्याचं वृत्त आहे. बच्चू कडू यांनाही मुख्यमंत्र्यांनी फोन करून मुंबईत बोलावलं होतं. तशी माहितीच बच्चू कडू यांनी दिली. मात्र, मुख्यमंत्र्यांचा फोन येऊनही बच्चू कडू अमरावतीतच आहेत. ते अमरावतीच्या बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्यात येणार नसल्याने ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. बच्चू कडू यांनीही सूचक प्रतिक्रिया व्यक्त केल्याने बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे.
मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला. पण मी अमरावतीतच आहे. आता मंत्रिमंडळात सामील व्हायचे की नाही हे मी सकाळी 11 वाजता जाहीर करणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माझा निर्णय जाहीर करणार आहे. अमरावतीतूनच मी माझा निर्णय जाहीर करणार आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मंत्रिपद मिळत नसल्यानेच बच्चू कडू सकाळी 11 वाजता आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. अपक्षांना सरकारमध्ये काही किंमत आहे की नाही माहीत नाही, असं सूचक विधानही बच्चू कडू यांनी केल्याने चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. बच्चू कडू आज आपला वेगळा निर्णय जाहीर करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे महायुतीत पहिली ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, अजित पवार गटाला वजनदार खाती देण्यास शिंदे गटाने जोरदा विरोध केला होता. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. अखेर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळाचा तिढा सुटला आहे. तसेच मंत्रिपद वाटपाचं सूत्रंही ठरलं आहे. त्यामुळे हा विस्तार होत आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.