नागपूर-काटोल चौपदरी मार्ग 24 महिन्यांत तयार होणार, वाहनांचा वेग वाढणार
नागपूर ते काटोल या 48.2 किलोमीटरच्या मार्गाचे काम सुरू आहे. या कामाचं कंत्राट रशियन कंपनी जाइंट स्टॉक यांनी घेतलंय. 590 कोटी रुपयांचा खर्च या मार्गावर होणार आहे. शिवाय काटोलमध्ये 11 किलोमीटरचा नवीन बायपास रस्ता तयार होत आहे.
नागपूर : नागपूर-काटोल मार्ग आता चौपदरी होत आहे. गेल्या महिन्यात या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. हा मार्ग 24 महिन्यांत तयार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर-काटोल मार्गाचे चौपदरीकरण झाल्यास वाहनांचा वेग वाढणार आहे. व्यापारी दृष्टिकोनातूनही याचा फायदा होणार आहे.
590 कोटी रुपयांचा खर्च
नागपूर ते काटोल या 48.2 किलोमीटरच्या मार्गाचे काम सुरू आहे. या कामाचं कंत्राट रशियन कंपनी जाइंट स्टॉक यांनी घेतलंय. 590 कोटी रुपयांचा खर्च या मार्गावर होणार आहे. शिवाय काटोलमध्ये 11 किलोमीटरचा नवीन बायपास रस्ता तयार होत आहे. बायपास रस्ता होत असल्यानं काटोलमध्ये वाहनांना जाण्याची आवश्यकता पडणार नाही. याशिवाय कळमेश्वरमध्येही बायपास आहे. आता या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारच्या भूमी अधिग्रहणाची आवश्यकता राहणार नाही, अशी माहिती प्रकल्प संचालक अभिजित जिचकर यांनी दिली.
8 प्रतिष्ठानांवर शोध पथकाची कारवाई
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. 25 नोव्हेंबर) रोजी 8 प्रतिष्ठानांवर कारवाई केली. 95 हजार रुपयांचा दंड वसूल केला. पथकानं 45 प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली. लसीचे डोज घेणाऱ्यांनाच प्रवेश द्यावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
मास्कशिवाय फिरणाऱ्यांकडून दंड वसूल
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (25 नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार 22 नागरिकांविरुध्द कारवाई केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 11 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी 41 हजार 858 नागरिकांविरुध्द कारवाई करून आतापर्यंत 1,92,88 हजारांचा दंड वसूल केला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अद्यापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचं दिसून येतं. नागरी भागात तर विनामास्क नागरिक बाजारपेठेत फिरताना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.