Devrao Dudhalkar passed away | उत्कट समर्पणशीलतेचा; सेवादलीय कार्यकर्ता

काँग्रेस सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, दलितमित्र श्री. देवरावजी दुधलकर यांचे आज मंगळवारी, 12 एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. आयुष्यभर समाजाची सेवा करणाऱ्या या निष्कांचन कार्यकर्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

Devrao Dudhalkar passed away | उत्कट समर्पणशीलतेचा; सेवादलीय कार्यकर्ता
काँग्रेस सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवराव दुधलकर यांचे निधन Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 10:37 AM

गजानन जानभोर

सेवादलाच्या माध्यमातून समाजातील दीन-दलित, शोषित वंचितांची सेवा करण्याचे कार्य देवराव दुधलकर (Devrao Dudhalkar) मागील 70 वर्षापासून करीत होते. ज्यांचे जगण्याचे, माणुसकीचे हक्क नाकारले गेले अशा वंचितांच्या अधिकारासाठी विधायक संघर्ष करणारे ते एक व्रतस्थ सैनिक होते. देवरावजींनी ‘सेवादल’ केवळ आचरणात आणले नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील ते अभिन्न अंग ठरले. गांधीजींचे जीवनमूल्य समजून आणि पचवून घेतलेला हा काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता होता. व्यावहारिकदृष्ट्या देवरावजींनी आयुष्यात काहीच मिळविले नाही. सपशेल अव्यवहारी आयुष्य जगले. घरादाराकडे, कुटुंबाकडे दुर्लक्ष करून त्यांनी स्वत:ला सेवादलासाठी झोकून दिले. त्यांच्यातील समर्पणशीलता एवढी उत्कट होती की, लोभात ते कधी पडले नाहीत. लबाड्या करणे जमत नसल्यामुळे कधी कुणाला फसविले नाही. स्वत:च्या मुलाबाळांचे पालकत्व पत्नीकडे सोपवून सेवादलाच्या तरुण कार्यकर्त्यांचे, वसतिगृहातील गरीब मुला-मुलींचे पालकत्व त्यांनी स्वीकारले. राजकारणात सत्ता-संपत्तीचे, दंभ, अहंकाराचे वारे ज्यांच्या कानात शिरतात ते नेते होतात. देवरावजी आयुष्यभर केवळ कार्यकर्तेच राहिले.

सेवादलाच्या नेहरू अवॉर्डने सन्मानित

पं. जवाहरलाल नेहरू, विनोबा भावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. ना. सू. हर्डीकर अशा थोरपुरुषांच्या सहवासात देवरावजी घडले. 1958 साली शिक्षकी पेशाचा राजीनामा देऊन सेवादलाचे पूर्णवेळ काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. गजाननराव आक्केवार, विठ्ठलराव टेकुलवार, शब्बीरभाई बद्रुद्दीन या सहकाऱ्यांसोबत काँग्रेस सेवादलाचे जाळे विदर्भात पसरविले. संपूर्ण भारतात चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे कार्य सर्वात उत्तम ठरले, ही बाब देवरावजी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विधायक कार्याची साक्ष देणारी होती. नशाबंदी मंडळाच्या माध्यमातून ते व्यसनमुक्तीचे कार्य करायचे. या कार्याचा गौरव म्हणून गांधी ट्रस्टच्या व्यसनमुक्ती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 1977 साली त्यांना दलितमित्र पुरस्कार मिळाला. अतिशय सन्मानाचा मानला जाणाऱ्या सेवादलाच्या नेहरू अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. देवरावजींना मिळालेल्या या पुरस्कारांचे मोल यासाठी आहे की, त्यावेळच्या कोणत्याही पुढाऱ्यांची, मंत्र्यांची शिफारस न घेता त्यांना हे पुरस्कार अकल्पितपणे मिळाले.

काँग्रेस अधिवेशनाच्या व्यवस्था विभागाचे प्रमुख

1958 मध्ये नागपुरात झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या व्यवस्था विभागाचे ते प्रमुख होते. या अधिवेशनादरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णशय्येवर असूनही संपूर्ण अधिवेशनाचे ते रुग्णालयातून नियंत्रण करीत होते. अधिवेशनातील व्यवस्था बघून पं. जवाहरलाल नेहरू प्रभावित झाले. त्यांनी चौकशी केली. स्वयंसेवक विभागाचा प्रमुख रुग्णालयातून संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून असल्याचे समजताच पं. नेहरू अक्षरश: भारावले. देवरावजींना भेटण्यासाठी ते रुग्णालयात गेले.

अख्खे आयुष्य संघटनेसाठी

एक गाव-एक पाणवठा ही चळवळ असो की भूदान चळवळ. समाज जागरणाच्या प्रत्येक चळवळीत देवरावजींनी स्वत:ला झोकून दिले. सेवादलाच्या कार्यासाठी संपूर्ण भारतात त्यांनी भ्रमण केले. थोरामोठ्यांचा सहवास आणि स्नेह मिळूनही कधी त्यांनी सत्ता-संपत्तीचा मोह बाळगला नाही. निवडणूक लढविण्याबाबत देवरावजींना अनेकदा आग्रह करण्यात आला. परंतु सेवादलाच्या कामाकडे दुर्लक्ष होईल, अशी सबब सांगून त्यांनी काँग्रेस नेत्यांना नम्रपणे नकार दिला. देवरावजींच्या कार्याचा जेव्हा विचार करतो, तेव्हा एक बाब प्रकर्षाने जाणवते. ज्या सेवादलामुळे काँग्रेस पक्षाला नैतिक बळ मिळाले, त्या काँग्रेस पक्षाने सेवादलाची व कार्यकर्त्यांची कायम उपेक्षा केली. देवरावजी, विठ्ठलराव टेकुलवार, गजानराव आक्केवार या माणसांनी आपले अख्खे आयुष्य या संघटनेसाठी दिले. या कार्यकर्त्यांजवळ स्वत: चे वैयक्तिक आयुष्य असे नव्हतेच. प्रसंगी कुटुंबियांचा, नातेवाईकांचा रोषही त्यांनी पचवला.

व्रतस्थ कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेची नाव हाकलताना काँग्रेसने दुधलकर, आक्केवार यांच्यासारखे सेवादल सैनिक ओळखले असते व त्यांचा उपयोग करून घेतला असता तर काँग्रेसची एक विधायक बाजू देशासमोर आली असती. काँग्रेस पक्षाने सेवादलाची अक्षम्य उपेक्षा केली. त्यामुळे सत्तेचा स्वीकार व अंमल करणाऱ्या या पक्षाला नंतर लोकांशी संपर्क ठेवता आला नाही. 1980 नंतर एन. एस. यु. आय., युवक काँग्रेसचा सपाटा सुरू झाला आणि काँग्रेसचा नैतिक आधार असलेले ‘सेवादल’ व त्यांचे कार्यकर्ते अडगळीत फेकण्यात आले. काँग्रेस नेत्यांचे पाय सेवादल कार्यालयाकडे वळेनासे झाले. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठीच या संस्कार केंद्राचा वापर होऊ लागला. नंतर तेही संपले. ग्रामीण भागातील माणसाशी नाळ जोडण्याचे ‘सेवादल‘ हे एक विधायक माध्यम होते. पण संघर्षातून प्रस्थापित झालेल्या नेत्यांना ते जपता आले नाही. सेवादलाच्या एक निष्कांचन, व्रतस्थ कार्यकर्ता आज आपल्यातून निघून गेल्यानंतर एका रचनात्मक चळवळीची आणि तिच्या समर्पित कार्यकर्त्यांची आपल्याच लोकांनी केलेली उपेक्षा मनात खोलवर सलत राहते..

(लेखक गजानन जानभोर हे नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.