शरद पवार यांच्या सभेला गर्दी करा, प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकर्त्यांना सूचना; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?
मी सगळ्या गोष्टी उघड करत नाही. देशात परिवर्तन इंडिया हे जे चालू आहे, हे काहीच नाही. यांच्याकडे काहीच नाही. नंतर खेकड्या सारख्या लढाई लढतील. देशात पुन्हा एनडीएचच सरकार बनणार आहे, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला.
भंडारा | 24 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भंडाऱ्यात सभा होणार आहे. अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात ही सभा होत आहे. या सभेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, शरद पवार यांच्या इतर सभांप्रमाणेच ही सभा मोठी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. शरद पवार यांच्या सभेला गर्दी करण्याच्या सूचना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या समर्थकांना दिल्या आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीत पडद्यामागं नेमकं काय सुरू आहे? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल हे पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात पोहोचले. यावेळी त्यांच्या जंगी सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाच्या वेळी त्यांनी शरद पवारांना टोला लगावला आणि विविध विषयांना हात घालत शेवटी शरद पवारांची जर सभा झाली तर, त्या सभेला गर्दी झाली पाहिजे म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी सभेला आवर्जून जावे अशाही सूचना यावेळी त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पवारांचं स्वागत करणार
शरद पवार आपल्या जिल्ह्यात आलेत तर, मी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी जाणार आहे. तुम्ही पण या. गर्दी जमवण्यासाठी आपण जावू, त्यांच स्वागत करू, असं खुद्द प्रफुल पटेल म्हणाले. साहेबांच्या सभेला आपल्याशिवाय कोणीही गर्दी करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या सभेला आपण आवर्जून जाऊ. भाषणात माझ्याविरुद्ध बोलले तरी ते ऐकून घेऊ, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
आम्ही बाळ नाही
राष्ट्रवादी पक्ष हा आपलाच आहे. पक्षात गटतट नाही. घड्याळ आपलीच असून कुणाच्याही मनात शंका नको. आयुष्यात सर्वांना कधी ना कधी महत्वाचा निर्णय घ्यावे लागतात. शरद पवार नेते होते, आहे आणि राहणार. त्यांच्याबद्दलचा आदर कमी होणार नाही. तात्पुरती नाराजी असेल. त्यामुळे दुरावा असेल. आम्ही घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून घेतलेला आहे. शेवटपर्यंत राष्ट्रवादीसोबत राहू. राजकीय परिस्थिती, राज्याच्या विकाससाठी हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही बाळ राहिलो नाही, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना लगावला.
हे का नाही चालत?
विरोधी पक्षात असताना काम करताना अडचण आल्या. त्यामुळे सत्तेत गेलो. राष्ट्रवादीचे 54 आमदार आणि काँग्रेसचे 44 आमदार यामुळे शिवसेना सत्तेत आली. वैचारिकरित्या आपल्यासोबत होती. तेव्हा शिवसेना चालली. मग आता शिवसेनाच आहे, हे का नाही चालत?, असा सवाल त्यांनी केला.