Chandrapur Accident : चार वर्षाचा मुलगा रात्रभर मृत आईला बिलगून रडत होता… 30 फूटावरून कोसळल्यानंतर काय घडलं?
चंद्रपूरमध्ये एक अत्यंत दुर्देवी अपघात झाला आहे. मुलासाठी चॉकलेट आणायला जाते असं सांगून घरातून बाहेर पडलेली गर्भवती महिला परत आलीच नाही. रात्रभर शोध घेतल्यानंतर एका पुलाखाली तिचा...
चंद्रपूर | 20 ऑक्टोबर 2023 : चंद्रपूरमध्ये अत्यंत भीषण आणि दुर्देवी अपघात झाला आहे. मुलाला चॉकलेट आणायला जाते म्हणून एक गर्भवती महिला चार वर्षाच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडली. नदीवरील पुलावरून जात असताना स्कुटीवरून तिचं नियंत्रण सुटलं आणि गाडीसह ती 30 फूट खोल खाली कोसळली. या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला. सुदैवाने तिचा चार वर्षाचा मुलगा वाचला. पण त्याला अपघातात प्रचंड मार लागला आहे. आईचा मृत्यू झाल्यानंतरही तो रात्रभर मृतदेहाला बिलगून रडत होता. पुलाखालील हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मनात कालवाकालव झाली. अनेकांना अश्रू अनावर झाले.
बुधवारी संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली. सुषमा पवन काकडे असं या महिलेचं नाव आहे. ती तीन महिन्याची गर्भवती आहे. बामनीच्या आदित्य प्लाझा येथे सुषमा राहते. चार वर्षाच्या मुलाला चॉकलेट आणायला जाते असं सांगून ती घरातून बाहेर पडली होती. सोबत तिने मुलाला घेतलं होतं. बामनीवरून ती राजूराला जात होती. वर्धा नदीच्या पुलावरून जात असताना स्कुटीवरील तिचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे स्कुटी थेट 30 फूल खोल पुलावरून खाली कोसळली. त्यामुळे सुषमा गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्यासोबत तिचा मुलगाही कोसळला होता. त्यालाही बराच मार लागला. पण सुदैवाने तो बचावला. संध्याकाळी अंधार पडल्याने अपघात झाल्याचं कुणाच्याच लक्षात आलं नाही.
रात्रभर सर्च ऑपरेशन
सुषमा घरी आली नाही म्हणून तिच्या कुटुंबांने बरीच शोधाशोध केली. तिचा फोनही लागत नव्हता. नातेवाईकांकडे विचारपूस केली. पण ती काही सापडली नाही. अखेर तिच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि तक्रार दिली. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन रात्रभर सर्च ऑपरेशन केलं. पण तिचा शोध लागला नाही.
गुरुवारी सकाळीच पोलिसांनी वर्धा नदीच्या पुलाकडे येऊन शोध घेतला. त्यावेळी नदीच्या किनारी सुषमाचा मृतदेह पडलेला आढळला. तिचा चार वर्षाचा मुलगा आईला बिलगून रडत होता. रात्रभर रडून रडून त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्याला बराच मारही लागला होता. मुलाला आईला बिलगून रडताना पाहून अनेकांचं हृदय हेलावून गेलं. अनेकांना तर अश्रू आवरण कठिण झालं.
एक वाजता तक्रार
पोलिसांनी तात्काळ सुषमाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. काकडे कुटुंबीयांनी बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास ती हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर आम्ही शोधाशोध सुरू केली, असं बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितलं.
लास्ट लोकेशन ट्रेस केलं अन्…
सुषमा हिचा नवरा पवन काकडे हे बँक कर्मचारी आहेत. सुषमा मुलाला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घराच्या बाहेर पडली होती. तसेच बामनी गावात देवीचं दर्शन घेणार असल्याचंही तिने सांगितलं होतं, असं पवन यांनी पोलिसांना सांगितलं. दुसरीकडे पवन यांनी ईमेलच्या माध्यमातून सुषमाचं लास्ट लोकेशन ट्रेस केलं.
तिचं लास्ट लोकेशन बामणी राजूरा मार्गावरील वर्धा नदीच्या जवळ दाखवत होतं. ही माहिती मिळताच पहाटे 4 वाजताच पवन यांनी पोलिसांसह नदी किनारी धाव घेऊन शोध मोहीम हाती घेतली. पुलाजवळ येताच त्यांना मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर सुषमाचा मृतदेह पडलेला दिसला. तसेच लहान मुलगा रडत असल्याचंही दिसलं.
प्रत्येक अँगलने तपास
सुषमा हिचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. त्यात तिच्या मानेचे हाड तुटल्याचं दिसून आलं आहे. तसेच तिचा हात फ्रॅक्चर झाल्यांचही स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण मुलाला चॉकलेट आणण्यासाठी सुषमा 5 किलोमीटर दूर का केली होती? हा प्रश्न असून आम्ही त्याचा तपास करत आहोत. या प्रकरणाच्या प्रत्येक अँगलने तपास करण्यात येणार असल्याचं उमेश पाटील यांनी सांगितलं.