Sanjay Raut on Navneet Rana: गोवऱ्या स्मशनात ठेवा तरच मातोश्रीकडे पाहा; संजय राऊतांचा इशारा
Sanjay Raut on Navneet Rana: या भंपक, बोगस लोकांच्या खांद्यावर भाजपचे काही लोक बंदूक ठेवून हल्ला करत होते.
नागपूर: या भंपक, बोगस लोकांच्या खांद्यावर भाजपचे काही लोक बंदूक ठेवून हल्ला करत होते. काल आणि आज मातोश्रीवर (matoshree) घुसून काही करण्याचं कारस्थान त्यांनी रचलं होतं. हनुमान चालिसा आपल्या घरात वाचता येतो. मंदिरात जाऊन वाचता येतो. अनेक अध्यात्माच्या जागा आहेत तिथेही वाचता येईल,त्यासाठी मातोश्रीची जागा निवडणं आणि मुंबईत दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणं हे कुणाचं कारस्थान आहे, असं सांगतानाच शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका. दीड शहाण्यांना सांगतो. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका. मातोश्रीची छेडछाड करू नका. नाही तर 20 फूट खोल खाली जाल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोरील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. मातोश्रीच्या किंवा शिवसेनेच्या नादाला लागायचे असेल तर तुमच्या गोवऱ्या स्मशानात पोहोचवून याव्यात, असा इशाराही त्यांनी दिला.
संपूर्ण वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत होता. मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा वाचू, मातोश्रीत घुसू अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरली. जणू काही आम्ही महान योद्धे आहोत. सत्यवादी आहोत अशा प्रकारचा आव आणून बंटी बबली मुंबईत आले. त्यांनी थोडा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मुंबईत मोदींचा दौरा आहे त्याला गालबोट लागू नये या सबबी खाली त्यांनी पळ काढला. त्यांनी शेपूट घातलं. पंतप्रधानांचा दौरा आहे, त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचेही आहेत. ते एका पक्षाचे नाहीत. पंतप्रधानांविषयी आम्हालाही नितांत आदर आहे. मोदींच्या दौऱ्याला गालबोट लागावं असं आम्हाला शिवसेनेला आवडणार नाही. पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी शिवसेना ठाम उभी राहील. गालबोट लावणाऱ्यांचा समाचार घेण्यासाठी सेना उभी राहिल, असं राऊत म्हणाले.
त्यांचा दावा खोटा
मोदींचा दौरा असल्याने आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत हा त्यांचा दावा खोटा आहे. शिवसैनिकांचा रेटा आहे. हजारो शिवसैनिक मुंबईत रस्त्यावर उतले आहेत. काही शिवसैनिकांनी रुग्णवाहिकाही ठेवल्या होत्या. चांगल्या रुग्णवाहिकांना ठेवल्या होत्या. एमर्जन्सीसाठी या रुग्णवाहिका तैनात केल्या. मानवतावादी दृष्टीकोण पाहा. किती काळजी घेतात शिवसैनिक, असा चिमटाही त्यांनी काढला.
राणा दाम्पत्यांचा हिंदुत्वाशी संबंध काय?
राणा दाम्पत्यांचा हिंदुत्वाशी संबंध काय? रामाचं नाव घ्यायला, अयोध्या आंदोलनाला बंटी बबलीचा विरोध होता. आज ते अशी भाषा वापरून आव्हान देत आहेत. सेनेचं आंदोलन घंटाधारीचं नाही. घंटा वाजवणाऱ्यांचं. गदाधारीचं आहे. कायम हातात गदा आणि तलवार घेतली आहे. दीडशहाण्यांना सांगतो सेनेच्या वाट्याला जाऊ नका. मातोश्रीची छेडछाड करू नका. 20 फूट खाली गाडले जाल. कॅमेऱ्यासमोर सांगतो. शिवसेनेच्यासंयमाची परीक्षा पाहू नका. आज तुमच्या विषाला हिंदुत्वाच्या नावाने उकळी फुटली आहे. ती तिथेच दाबण्याची ताकद शिवसेनेत आहे, असं त्यांनी सांगितलं.
राज्यपालांना संविधान सांगा
आम्हाला धमक्या देऊ नका. मी नागपुरातच आहे. मुख्यमंत्र्यांनी मला नागपुरातच राहायला सांगितलं आहे. धमक्या देऊ नका. राष्ट्रपती राजवट कधी लावली जाते आणि का लावली जाते आणि कोणत्या परिस्थितीत उठवली जाते हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला सांगण्याची गरज नाही. पहाटे राष्ट्रपती राजवट उठलेली आहे. त्यामुळे घटनात्मक तरतुदी आम्हाला सांगू नका. कायदा आणि घटना कुणाला सांगायचा असेल तर राज्यपालांना सांगा ते राजभवनात बसले आहेत. फाईल पेंडिग आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
सुरक्षा का मिळाली खासगीत सांगतो
नवनीत राणा यांना सुरक्षा का मिळाली ते खासगीत सांगू. जातीचं बोगस सर्टिफेकट वापर करून त्यांनी निवडणूक लढवली. हायकोर्टाने शिक्का मारला. खटला हरलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. अशा बोगस सर्टिफेकटवर निवडून आलेल्यांनी नितिमत्तेच्या गोष्टी शिकवू नये. ही ठाकरेंची शिवसेना आहे, अशी टीकाही त्यांनी केली.