पंचमहाभूतांचे संरक्षण कराल तर तुम्ही…, डॉ. संजय दुधे यांचे आवाहन नेमकं काय?
आपली पृथ्वी ही पंचमहाभूतांपासून निर्माण झाली आहे. आपण देखील त्याचा घटक आहोत.
नागपूर : आपण राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहोत. कर्तव्य कठोरता हा आपला अंगीभूत गुण आहे. मागील वर्षी ‘हर घर तिरंगा’ तर यावर्षी ‘माझी माती माझा देश’ उपक्रम राबवत आहे. ‘माझी माती माझा देश’ हे अभियान पृथ्वी वाचविण्यासाठी आहे. जल, जमीन, जंगल आपणास वाचवायचे आहे. झाड हे निसर्गातील महत्त्वपूर्ण घटक आहे. ते आपणास प्राणवायू देतात. संपूर्ण सृष्टीची प्रकृती चांगले ठेवण्याचे काम झाड करते. त्यामुळे रासेयो स्वयंसेवक म्हणून आपण राहतो. त्या भागात वृक्षारोपण करीत वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले.
आपली पृथ्वी ही पंचमहाभूतांपासून निर्माण झाली आहे. आपण देखील त्याचा घटक आहोत. त्यामुळे पंचमहाभूत सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित राहू, असेही डॉ. संजय दुधे म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘माझी माती माझा देश’ अभियान राबविण्यात आले. या अभियान अंतर्गत महाराज बाग स्थित विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर ते फ्रीडम पार्कपर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली.
पर्यावरण चांगले करण्याचा प्रयत्न करा
लोकांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वृक्षतोड केली. सोबत भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिकीकरणाच्या नावाखाली प्रदूषणास सुरुवात झाली. त्यामुळे शहरात सिमेंट आणि प्लास्टिकचा कचरा निर्माण झाला. पूर्वी गावाला लागून मोठ्या प्रमाणात जंगल असायचे. ती जंगले नामशेष झाली आहेत, याबाबत प्र-कुलगुरुंनी चिंता व्यक्त केली. वृक्ष लागवड करीत पर्यावरण चांगले करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.
स्वयंसेवकांनी घेतली पंचप्राण प्रतिज्ञा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘माझी माती माझा देश’ अभियान अंतर्गत पंचप्राण प्रतिज्ञा घेत वीरांना वंदन कार्यक्रम राबविला. शनिवारी नागपूर शहरातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहभागी होत वृक्षदिंडी काढली. विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर ते फ्रीडम पार्क अशी वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षदिंडीनंतर रासेयो कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांनी पंचप्राण प्रतिज्ञा घेतली.
वीरांना वंदन कार्यक्रमात माजी सैनिकाचा सत्कार
विद्यापीठ दीक्षांत सभागृहात आयोजित ‘वीरांना वंदन’ कार्यक्रमात माजी सैनिक संतोष मालेवार यांचा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी सैन्यात सामील व्हा. गौरव वाटेल अशी अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल, असे मालेवर म्हणाले. मुलींनी देखील भारतीय सैन्यामध्ये दाखल होण्याचे आवाहन त्यांनी केले. सेनेतून निवृत्त झालो तरी सत्कार होतात आणि शहीद झालो तरी सन्मान मिळतो, असे ते म्हणाले.