वन नेशन, वन इलेक्शनवरून शरद पवार यांचा मोदींना टोला; म्हणाले, त्यांना चार राज्यांच्या…
बांगलादेशात उठाव झाला. त्याची प्रतिक्रीया भारतात उमटली. परंतु महाराष्ट्रात त्याची परीणाम होईल अस वाटले नव्हते. राज्यात शांतता कशी राहील याची खबरदारी घ्यावी लागेल, असं सांगतानाच गृहखात्याच्या कारभारावर बोलता येईल. परंतु आज शांतात हवी आहे, असं माजी केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले.
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. पण झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वन नेशन, वन इलेक्शनचा नारा देत असताना चार राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेण्यात आल्या नाहीत. त्यावरून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदींना टोला लगावला आहे. वन इलेक्शन, वन नेशनचा नारा देणाऱ्यांना चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेता आल्या नाहीत, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. नागपूर येथे आले असता शरद पवार यांनी हा टोला हाणला.
प्रधानमंत्री यांनी भाषण देताना देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात अशी भूमिका वारंवार मांडत आहेत. काल जम्मू-काश्मीरची निवडणूक जाहीर झाली. हरियाणाची निवडणूक जाहीर झाली. झारखंड आणि महाराष्ट्राची मात्र निवडणूक जाहीर झाली नाही. देशाच्या निवडणुका एकत्रित व्हाव्यात असं सांगणाऱ्यांना चार राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेता आल्या नाहीत. पंतप्रधानाचा महाराष्ट्राबद्दलचा निर्णय हा एक प्रकारचा विरोधाभास आहे. याबद्दल आणखी काय सांगायचं? असा टोला शरद पवार यांनी लगावला.
जे घडलं ते राज्याच्या हिताचं नाही
बांगलादेशात सत्ता परिवर्तन झालं. सत्ता परिवर्तनासाठी उठाव झाला, त्यानंतर काही गोष्टी घडल्या. त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटत आहे. बांगलादेशमध्ये जे घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रातून येतील असं काही वाटलं नाही. त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काही घडलं, ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही. आज शांततेची गरज आहे. यासाठी राजकारण्यांनी आणि समाजकारण करणाऱ्यांनी संयमी भूमिका घ्यावी, खबरदारी घ्यावी, असं शरद पवार म्हणाले.
गृहखात्यावर नंतर बोलेन
बांगलादेशमध्ये घडलं त्याचे परिणाम इथे घडण्याचे काही कारण नव्हतं. अन्य देशात घडलेल्या गोष्टींसाठी आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्धवस्त होईल किंवा संकटात जाईल असं काही करू नये, असं आवाहन करतानाच शासनाची भूमिका आणि गृह खात्याच्या जबाबदारीवर भाष्य करता येईल. पण ते मी आज करणार नाही. आज शांतता महत्त्वाची आहे, असंही ते म्हणाले.
फक्त लाडक्या खुर्चीसाठी सुरू
दरम्यान, माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही यावेळी भाष्य केलं. शरद पवार यांनी महिला वर्गासाठी मोठं काम केलं आहे. कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी मोठं काम केलं आहे. अन्नधान्य उत्पादन वाढीला मोठा वाव दिला. आता आपल्या देशात अन्नधान्य आयात करावं लागतं. निवडणूका आल्यामुळे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आलाय. हे फक्त लाडक्या खुर्चीसाठी सुरु आहे, असा चिमटा अनिल देशमुख यांनी काढला.