Nagpur School | शहरातील एक ते सातच्या शाळांना थांबा, केव्हा घेणार मनपा प्रशासन निर्णय?
कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेश 15 डिसेंबरनंतर जारी करण्यात येतील. मात्र मनपा क्षेत्रातील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग पूर्वी प्रमाणेच सुरु राहतील.
नागपूर : कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनची भीती अद्याप कायम आहे. हे लक्षात घेता नागपूर महापालिकेने मनपा क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास पुन्हा 15 डिसेंबर 2021 पर्यंत स्थगिती दिली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी यासंबंधीचे आदेश शुक्रवारी, 10 डिसेंबर रोजी जारी केले. याबाबत कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेश 15 डिसेंबरनंतर जारी करण्यात येतील. मात्र मनपा क्षेत्रातील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग पूर्वी प्रमाणेच सुरु राहतील.
पहिली ते सातवी ऑनलाईन वर्ग राहतील
महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात सूचना दिली होती. मात्र मनपा आयुक्तांनी नवीन कोरोना व्हेरिएंटचा धोका लक्षात या वर्गातील शाळा सुरू करण्यावर स्थगिती दिली आहे. मनपा आयुक्तांनी हा निर्णय साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्राप्त अधिकारानुसार घेतला आहे. शिक्षण विभागा व्दारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णत: बंद राहतील. मात्र या वर्गाचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहील.
मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन नको
संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश/मार्गदर्शक सूचना व त्यानुसार लागू असणारे प्रतिबंधात्मक आदेश व उपाययोजना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोविड – 19 च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाव्दारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करू नका. नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार, अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील.
मास्क वापरणे सोडू नका
सध्या कोरोना विषाणुचा नवा प्रकार ओमिक्रॉन आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनाने सदर विषाणू प्रकारास व्हेरिएंट आफ कंर्सन म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळं नागरिकांनी सर्व कोविड नियमांचे पालन करावे आणि घराबाहेर पडताना मास्क, सतत सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखून व्यवहार करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आहे.