सावधान! मेडिकल प्रवेशासाठी डोनेशन देताय? एक लाख घेताना भामटा अटकेत
नागपूर : डॉक्टर बनविणं बहुतेक पालकांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते डोनेशन द्यायलाही तयार असतात. ही संधी साधून कामठी मार्गावरील नरेश लक्ष्मण इंगळे (गुलमोहर अपार्टमेंट, टेका नाका) हा सावज हेरायचा. डोनेशनची मागणी करून मेडिकलसाठी प्रवेश देण्याचे आमिष द्यायचा. अशाच एका प्रकरणात नरेश इंगळेला एक लाख रुपयांची मागणी करताना अटक करण्यात आली. एक लाखाची खंडणी घेताना अटक […]
नागपूर : डॉक्टर बनविणं बहुतेक पालकांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते डोनेशन द्यायलाही तयार असतात. ही संधी साधून कामठी मार्गावरील नरेश लक्ष्मण इंगळे (गुलमोहर अपार्टमेंट, टेका नाका) हा सावज हेरायचा. डोनेशनची मागणी करून मेडिकलसाठी प्रवेश देण्याचे आमिष द्यायचा. अशाच एका प्रकरणात नरेश इंगळेला एक लाख रुपयांची मागणी करताना अटक करण्यात आली.
एक लाखाची खंडणी घेताना अटक
तुम्हाला एमबीबीएसला प्रवेश हवा असेल, तर मला सांगा मी तुमचे काम करून देतो. असं सांगून नरेश इंगळे हा पालकांना लुटायचा. त्यासाठी तो दहा लाख रुपयांच्या डोनेशनची मागणी करायचा. ५० ते ६० लाख रुपये खासगी मेडिकलच्या अॅडमिशनला लागतील, असं सांगायचा. अशाच एका प्रकरणात यवतमाळचे सुनील नागपुरे, वर्धाचे किशोर मेश्राम आणि रवींद्र वाघमारे फसले. आपली फसवणूक होते, हे लक्षात आल्यानंतर नागपुरे, वाघमारे यांनी पोलिसांची मदत घेतली.
आरोपीला चार दिवसांची कोठडी
गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकानं कारवाईसाठी पुढाकार घेतला. शनिवारी सायंकाळी इंगळेच्या सीताबर्डी येथील कार्यालयावर छापा टाकण्यात आला. प्रवेशासाठी अॅडव्हान्स म्हणून एक लाख रुपयांची रोकड घेताना नरेशला गुन्हे शाखेनं अटक केली. नरेशकडून एक लाख रुपयांची रोकड, सोनसाखळ्या अंगठ्या लॅपटॉप, तीन मोबाईल, असा सुमारे पाच ते सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयातून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली. आणखी कुणाकुणाला फसविले याची चौकशी आता पोलीस करतील. यातून नरेशचे कारनामे समोर येतील.
यांनी केली कारवाई
ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात खंडणीविरोधी पथकाचे एपीआय ईश्वर जगदळे, हवालदार राजेंद्र ठाकूर, नायक सुधीर सोंधरकर, अजय पोहाणे, नितीन वासने आणि सूरज ठाकूर यांनी केली. अशाप्रकारे कुणाही फसवणूक झाली असेल तर त्यांनी सीताबर्डी पोलीस किंवा गुन्हे शाखेत संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय.
नरेश हा कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये मालक किंवा संचालक नाही. तसेच कर्मचारीसुद्धा नाही. तरीही तो प्रवेशाचे आमिष दाखवायचा. आपल्या शासकीय तसेच खासगी मेडिकल कॉलेजमध्ये ओळख्या आहेत. असे भासवून पालकांना थाप मारायचा. पालकही आंधळे होऊन त्याच्यावर विश्वास ठेवायचे. यातून काही जणांची फसवणूक झाली.