खरी राष्ट्रवादी कुणाची?, ‘या’ तारखेनंतर होणार दूध का दूध आणि पानी का पानी; खुद्द प्रफुल्ल पटेल म्हणाले, जबाबदारीने सांगतो…
इंडिया करून होत नाही.फेविकॉल लावून सुद्धा जुडणार नाही. पण हे वास्तवात येऊ शकत नाही. ही अनैतिक आघाडी आहे. डावे उजवे हे काय चाललं आहे? चंद्रयान गेले. पण स्तुती करायला सुद्धा तयार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
नागपूर | 3 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही. आम्ही एकच आहोत. फक्त आमच्यातील एका गटाने वेगळा विचार केला आहे. त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळच आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडलेली आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे असून लवकरच राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावर निर्णय होणार आहे. स्वत: अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली आहे. पटेल यांच्या या विधानामुळे शरद पवार गट तोंडघशी पडल्याचं सांगितलं जात आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. मी जबाबदरीने सांगतो, निवडणूक आयोगात 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुद्दत आहे, त्यानंतर सुनावणी होईल. येत्या 15 -20 दिवसात निकाल लागून, आमच्या बाजूने निकाल लागेल. कारण 43 आमदारानी आम्हाला पाठिंबा दिला आहे. सर्वाधिक लोक अजितदादांना पाठिंबा देत असल्यानं आपल्याला चिन्ह मिळेल हा विश्वास आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
काही अडचणी येतातच
पक्षाच चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. आम्ही घेतलेली भूमिका स्पष्ट आहे. आम्ही एनडीएचे घटक म्हणून काम करणार आहोत. आमच्या तिन्ही पक्षात समन्वय आहे. काही बातम्या येतात की समन्वय नाही. पण आमच्यात पूर्णपणे समन्वय आहे. तीन पक्ष एकत्रित येतात तेव्हा काही गोष्टींवर अडचणी येतात. मात्र त्यावर तोडगा काढला जातो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
योग्य हिस्सा मिळेल
सत्तेत योग्य हिस्सा मिळेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. मंत्रिमंडळ विस्तार किंवा पालकमंत्री पद यावर सुद्धा चर्चा सुरू आहे. ज्यांना विरोध करायचा ते करतात. काही आमदार कमजोर आहेत, असं दाखविण्याचा विरोधक प्रयत्न करतात. मात्र आमचे सगळे आमदार ताकतवर आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
सवलतीची आवश्यकता नाही
आम्हाला सवलतीच्या आवश्यकता नाहीत. सर्व समाजाच्या घटकांना त्याची हिस्सेदारी आहे, असे वाटत नाही, तोपर्यंत आपण समोर जाऊ शकत नाही. आदिवासीतून धर्मरावबाबा हे मंत्री झाले. काही लोक भाजप विरोधात भ्रम पसरवत आहेत. कुठलीच गडबड नाही. पुढली निवडणूक कोण जिंकणार असा प्रश्न विचारला जातो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच नाव येते, असं त्यांनी सांगितलं.
मोदींमुळे देशाचा सन्मान
देशाचं नाव आज जगभर सन्माने घेतले जात आहे. काँग्रेस सत्तेत असताना कटोरा घेऊन भीक मागत होते. मी सुद्धा कॅबिनेट मंत्री होतो. त्यावेळी परिस्थिती पहिली. पण आज परिस्थिती बदली आहे. परदेशात आपल्या देशाचा बहुमान वाढला आहे. केवळ सत्तेत आलो म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत नाही. हे जनतेनेही मान्य केले आहे, असं ते म्हणाले.
इंडिया आघाडीची घडी विस्कटली
यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. इंडिया आघाडीची बैठक झाली. जेवणं करून निघून गेले. एका लोगोचं अनावरण होऊ शकलं नाही. यांचं लोगोवर एकमत होऊ शकलं नाही. कारण वादावादी झाली. संयोजक नियुक्त झाला नाही. राहुल गांधी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल यांच नाव संयोजक म्हणून पुढे आले. तुम्ही लोगो करू शकत नाही, संयोजक करू शकत नाही. यांची घडी विस्कटली आहे, असा दावा त्यांनी केला.