Bhandara ZP Election | नाना पटोलेंच्या गृहजिल्ह्यातच बंडखोरी!, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षांसह पाच कार्यकर्त्यांचे का झाले निलंबन?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यात भंडारा काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वातावरण आहे. अधिकृत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराच्या प्रचार करणाऱ्या 5 पदाधिकाऱ्यांना मध्यरात्री नाना पटोले यांनी 6 वर्षासाठी निलंबित केले.
भंडारा : जिल्हा परिषद निवडणुकीचे आज मतदान सुरू आहे. दरम्यान रात्री, पाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निलंबित करण्यात आले. सहा वर्षांसाठी त्यांचे निलंबन केल्याचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी सांगितलं. हे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून देण्यात आल्याचं पत्रकात म्हटलं आहे.
यांचे झाले निलंबन
जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार राऊत, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष वाडिभस्मे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव पांडुरंग निशाने, ठाण्याचे जिल्हा प्रभारी मुन्ना भोंगाडे, पंचायत समिती प्रभारी जितेंद्र पडोळे या पाच जणांचे निलंबन करण्यात आले आहे. या पाचही जणांनी भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार केला नाही. उलट अपक्ष उमेदवाराचा प्रचार करत असल्याचं प्रदेश कार्यालयाकडं लेखी स्वरूपात तक्रार प्राप्त झाली. हे कृत्य पक्षविरोधी असल्यानं पाचही जणांचे निलंबन केल्याचं पत्रकात म्हटलं आहे.
पटोलेंच्या गृहजिल्ह्यातच बंडखोरी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यात भंडारा काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वातावरण आहे. अधिकृत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराच्या प्रचार करणाऱ्या 5 पदाधिकाऱ्यांना मध्यरात्री नाना पटोले यांनी 6 वर्षासाठी निलंबित केले. काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षाचाही समावेश आहे. ठाणा परसोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जुन्या काँग्रेस उमेदवाराला उमेदवारी न देता भाजपा आयात व्यक्तीला काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं जुन्या काँग्रेसी व्यक्तीने अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळं ही कारवाई मध्यरात्री करण्यात आली. मतदानाच्या आधीच ही कारवाई केल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
जुनी व नवीन काँग्रेस असा विरोध
भंडारा : अपक्ष उमेदवाराचा प्रचार अधिकृत नेत्यांकडून झाला. याचे कारण म्हणजे पक्षातील निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या उमेदवाराला दिलेली तिकीट होय. हे लक्षात आल्यानंतर सोमवारी रात्री बारा वाजतानंतर पाच कार्यकर्त्यांना निलंबित करण्यात आलं. मतदानाच्या आधल्या दिवशी हे निलंबन झाल्यानं पक्षामध्ये अस्वस्थता आहे.