Nashik | नाशिकमध्ये 14 वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन होणार; कोणत्या तारखांना रंगणार मैफल?
नाशिकमध्ये तब्बल 22 वर्षांनी हे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी 2000 मध्ये हे संमेलन नाशिक येथे झाले होते.
नाशिकः नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात झालेले भव्य-दिव्य आणि डोळे दिपवून टाकणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उभ्या महाराष्ट्राने पाहिले. या संमेलनाला राज्यभरातून लाखो रसिकांनी हजेरी लावली. शेवटच्या दिवशी तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. आडगाव मेट परिसरात अक्षरशः किती तरी वेळ वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. या साऱ्या आठवणी ताज्या असताना आता नाशिकमध्ये 14 वे अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या संमेलनाला राज्यभरातून रसिक हजेरी लावतील, असा आशावादही आयोजकांनी व्यक्त केला.
या तारखांना संमेलन
अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक संस्था व मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 ते 27 असे तीन दिवस हे संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी तनवीर खान (तंबोली) यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक संस्था आणि मुस्लिम मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला डॉ. फारूख शेक, माजी उपमहापौर गुलाम ताहेर शेख, इकबाल मिन्ने, निरंजन टकले, इमरान चौधरी, पप्पू शेख आदींची उपस्थिती होती.
22 वर्षांनी योगायोग
नाशिकमध्ये तब्बल 22 वर्षांनी हे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी 2000 मध्ये हे संमेलन नाशिक येथे झाले होते. सोलापूर, नागपूर, रत्नागिरी, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे, पनवेल, नवी मुंबई, मुंबई येथेही ही संमेलने झाली आहेत. नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन हे भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार आहे. संमेलनात तिन्ही दिवस विविध परिसंवाद, कविसंमेलन, चर्चासत्र असे अनेक कार्यक्रम होणार आहेत. या संमलेनाला रसिकांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उदगीरमध्ये एप्रिलमध्ये संमेलन
दरम्यान, दुसरीकडे उदगीरमध्ये 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 22 ते 24 एप्रिल दरम्यान होणार आहे. या संमेलनाचे निमंत्रक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, उदगीर ही संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी सासणे यांच्या पुणे येथील घरी जावून त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना संमेलनाचे निमंत्रण आणि अभिनंदन पत्र देण्यात आले. लातूर जिल्ह्यात होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. तसा उदगीर हा सीमावर्ती भाग. या परिसरात मराठी, कन्नड, उर्दू आणि तेलगू या भाषा बोलल्या जातात. या संमेलनात या चारही भाषांचा सन्मान होईल, अशा पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे, अशी माहिती निमंत्रकांनी अध्यक्षांना दिली. त्यामुळे या दोन्ही संमेलनाची रसिकांना उत्सुकता आहे.
इतर बातम्याः