नागरिकांनो, पाणी जपून वापरा, उद्या असणार पाणीपुरवठा बंद
Nashik Water Cut : पावसाळ्यापूर्वीची कामे वीज वितरण कंपनीने सुरु केली आहेत. त्याचा परिणाम पाणीपुवठ्यावर होणार आहे. यामुळे शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही तर रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
चंदन पुजाधिकारी, नाशिक : एप्रिल महिन्यात एकीकडे अनेक शहरांवर पाणी कपातीचं संकट आले आहे. तर दुसरीकडे महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वीची कामे सुरु केली आहे. यामुळे वीज पुरवठा बंद असणार आहे. त्याचा परिणाम शनिवारी (२९ एप्रिल २०२३) संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून होणाऱ्या शट डाऊनमुळे शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. या दरम्यान नागरिकांना पाण्याचा जपूर वापर करावा, असे आवाहन मनपाने केले आहे.
महावितरण करणार कामे
महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वीची काम सुरु केली आहे. त्यानुसार आता शनिवारी वीज उपकेंद्र आणि मुख्य वीज वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या गंगापूर आणि मुकणे धरणातील उपसा केंद्रांचा वीज पुरवठा बंद असणार आहे. शनिवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच रविवारी सकाळी कमी दाबाने, कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे, असे महानगरापालिकेने स्पष्ट केले आहे.
पाणी उचलता येणार नाही
महावितरणच्या दुरुस्तींच्या कामांमुळे शनिवारी पाणी उचलता येणार नाही. त्यामुळे या दिवशी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. गंगापूर व मुकणे धरणातून महानगरपालिका शहराला पाणीपुरवठा करते.
मनपाकडूनही कामे सुरु
नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरात पावसाळापूर्व नालेसफाईची कामे सुरु करण्यात आली आहेत. पावसाळी गटार, नाले, चेंबरची साफसफाई केली जात आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहरातील सहा विभागातील नाले सफाईची कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.
पावसाळ्यात नाले, गटारी तुंबून पाणी रस्त्यावर येऊ नये याची पुरेपूर दक्षता महानगरपालिकेकडून घेतली जाणार आहे. त्यानुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या सुचनेनुसार ठिकठिकाणी कामे हाती घेण्यात आली आहेत. पश्चिम विभागात कार्यकारी अभियंता सचिन जाधव, उभ अभियंता नितीन राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळा पूर्व नालेसफाईची कामे सुरु आहेत.