Nashik Nagar Panchayat Election| नाशिकमध्ये 6 नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी आज मतदान; 292 उमेदवार रिंगणात
राज्य निवडणूक आयोगाने सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायतींच्या 11 ओबीसी राखीव जागा आता खुल्या प्रवर्गात मोडणार आहेत. त्यासाठी 18 जानेवारी रोजी मतदान होईल.
नाशिकः नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी आज मंगळवारी मतदान होत असून, त्यासाठी 292 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण या नगरपंचायतींची निवडणूक सध्या सुरू आहे. सुरगाणा आणि पेठ नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण नाही. त्यामुळे येथे सर्वच्या सर्व 17 जागांवर निवडणूक होत आहे. निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतीत 14 जागांवर मतदान होणारय. देवळा येथे फक्त 11 जागांवर मतदान होणारय. या ठिकाणी 5 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. या निवडणुकीत एकूण 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात देवळा येथील दोन आणि दिंडोरी, कळवण नगरपंचायतीतील एकेका उमेदवाराचा समावेश आहे.
अशी रंगतेय रणधुमाळी…
दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगणार आहे. पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जागांवर निवडणूक होत आहे. निफडामध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होईल. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होणार आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होणार आहे.
आज सुट्टी जाहीर
मतदानाची प्रशासनाने चोख तयारी केली आहे. नगरपंचायतीच्या क्षेत्रातील मतदानासाठी स्थानिक क्षेत्रात पूर्ण दिवस सुट्टी जाहीर केली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणाऱ्या आस्थापना, कारखाने, दुकाने यांना मंगळवारी रहाणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील निफाड, पेठ,दिंडोरी, सुरगाणा, कळवण व देवळा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी इत्यादींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
येथे 18 जानेवारी रोजी मतदान
राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळा, दिंडोरी, कळवण तालुक्यातील 11 ओबीसी राखीव जागा आता खुल्या प्रवर्गात मोडणार आहेत. त्यासाठी नव्याने 23 डिसेंबर रोजी महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. उमेदवारांना 29 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 10 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या जागांचे 18 जानेवारी रोजी मतदान होईल आणि निकाल मात्र 19 जानेवारी रोजी लागेल.
इतर बातम्याः
Nashik rape| केवढे हे क्रौर्य…चिमुरडीच्या नरडीवर सुरी ठेवून आईवर बलात्कार, नाशिक हादरले!
No water in Nashik| नाशिकमध्ये बुधवारी कोणत्या भागात पाणीपुरवठा नाही, घ्या जाणून…