छोटा हत्ती, आयशर आणि कोंबड्या वाहून नेणाऱ्या दोन पिकअपची एकमेकांना धडक; नवीन कसारा घाटात विचित्र अपघात
दोन्ही पिकअपमधून कोंबड्यांची वाहतूक सुरू होती. अपघातामुळे दोन्ही पिकअपमधील कोंबड्याही मरून रस्त्यावर पडल्या होत्या. संपूर्ण रस्त्यावर कोंबड्या मरून पडलेल्या होत्या.
नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. हा अपघात अत्यंत विचित्र होता. चार गाड्या एकमेकांना धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोनजण ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचं नेमकं कारण समजलं नाही. मात्र, अपघात होताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदतीस सुरुवात केली. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आयशर, छोटा हत्ती आणि दोन पिक अप यांच्यात आज पहाटे नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात दोनजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताचे कारण अस्पष्ट आहे. जखमीला पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात केले दाखल करण्यात आलं आहे. दोन्ही पिकअपमधून कोंबड्यांची वाहतूक सुरू होती. अपघातामुळे दोन्ही पिकअपमधील कोंबड्याही मरून रस्त्यावर पडल्या होत्या. संपूर्ण रस्त्यावर कोंबड्या मरून पडलेल्या होत्या. कसारा पोलीस, महामार्ग पोलीस आणि रूट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. अपघातग्रस्त वाहने टोल क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
चंद्रपूरमधील मृतांची संख्या सहावर
दरम्यान, चंद्रपूर येथील नागपूर-नागभीड मार्गावरील कांपा येथे झालेल्या अपघातात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या एकूण लोकांची संख्या झाली सहा झाली आहे. गाडीत असलेल्या सर्व लोकांचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्व मृतक हे नागपुरातील रहिवासी आहेत. नागपूर येथून ब्रम्हपुरी येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल सोबत जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारा दरम्यान दोन जण दगावले.
मृतांची नावे
1) रोहन विजय राऊत (30) 2) ऋषिकेश विजय राऊत (28) 3) गीता विजय राऊत (45) 4) सुनीता रुपेश फेंडर (40) 5) प्रभा शेखर सोनावणे (35) 6) यामिनी रुपेश फेंडर (9)
मनमाडमध्ये बस पलटली
दरम्यान, मनमाडपासून जवळच धुळे-पुणे एसटी बस वादळाच्या तडाख्यात सापडली आहे. त्यामुळे मनमाड जवळ पुणे -इंदौर महामार्गांवर बस झाली पलटी. बसमधून 43 प्रवासी प्रवास करत होते. अपघातात 4 प्रवासी गंभीर जखमी झाले तर उर्वरित प्रवाशांना किरकोळ मार लागला. जखमी प्रवाशांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.