त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न नाही, ही दरवर्षीची प्रथा? ऊरुस आयोजकांचा दावा
त्र्यंबकेश्वर मंदिर वाद प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चार ऊरुस आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरीकडे ऊरुस आयोजकांनी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया देताना ही दरवर्षीची परंपरा असल्याचं म्हटलं आहे.
नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणात 4 ऊरुस आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये इतर धर्मीय प्रवेश करत असल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चौघांवर गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे संबंधित प्रकरणाची दखल स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
हे सर्व प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर ऊरुस आयोजकांनीदेखील या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. “आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही केवळ मंदिराच्या बाहेरुन धूप दाखवत होतो. ही दरवर्षीची प्रथा आहे”, असं ऊरुस आयोजकांनी सांगितलं. ऊरुस आयोजकांनी मागच्या वर्षीचादेखील व्हिडीओ ट्विट केला आहे. तर दुसरीकडे मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप मंदिर प्रशासनाकडून करण्यात येतोय.
ऊरुस आयोजकांचं नेमकं म्हणणं काय?
त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेरुन ऊरुसाची मिरवणूक काढली जाते ही दरवर्षीची प्रथा आहे, असं ऊरुस आयोजकांचं म्हणणं आहे. दरवर्षी मंदिराच्या दरवाज्यासमोर धूप दाखवली जात असल्याचं स्पष्टीकरण ऊरुस आयोजक सय्यद यांनी दिलं आहे. “आम्ही मंदिरात प्रवेश केला नाही”, असं सय्यद यांनी सांगितलं. तसेच धूप दाखवल्यानंतर मिरवणूक पुढे नेली जाते, असं ऊरुस आयोजकांनी सांगितलं.
“बाबांचा ऊरुस निघतो त्यावेळी संपूर्ण गावात मिरवणूक निघते. मिरवणूक बाबांच्या गेटवर येते तेव्हा धुनी दाखवली जाते. ती आमची शंकर भगवानवर भक्ती आहे. आमच्याबद्दल अफवा पसरवली जातेय की आमचा मंदिरात जाण्याचा प्रयत्न होता. तर आमचा मंदिरात जाण्याचा प्रयत्न नव्हता. आम्हाला फक्त उभं राहून धुनी दाखवू द्या, इतकंच आमचं म्हणणं होतं. ही अफवा बंद करा. यामुळे समाजाला चुकीचा मेसेज जातो”, अशी मागणी ऊरुस आयोजक सय्यद यांनी केली.
आचार्य भोसले यांच्याकडून व्हिडीओ ट्विट
दरम्यान, भाजप नेते आचार्य तुषार भोसले यांच्याकडून त्रंबकेश्वरचा गेल्या वर्षीचा व्हडियो ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडियोत काही मुस्लिम तरुण मंदिराच्या आत जाऊन धूप दाखवत असल्याचं दिसतंय. “हिंदूंसाठी दीर्घकाळ मंदिरे बंद ठेवणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या राज्यात मागच्या वर्षी मात्र त्र्यंबकराजाच्या मंदिर परिसरात हे लोक मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरले होते ; आता देवेंद्र फडणवीस यांनी ‘त्या’ घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत”, असं आचार्य भोसले आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.