Nashik|मालेगावमध्ये कोरोना लसीकरण नोंदणीत घोळ, चौकशीपूर्वीच 10 शिक्षकांचे निलंबन रद्द
मालेगावमधल्या संगमेश्वर वॉर्डात जुलै महिन्यात लसीकरण मोहीम राबवली. यात 2 जुलै 2021 रोजी कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांनी 13 जणांना कोविड लस न देताच प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे.
नाशिकः कोरोना लस न देताच प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावमध्ये घडला असून, याप्रकरणी महापालिका शाळेतील 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, त्या शिक्षकांचे चौकशी होण्यापूर्वीच निलंबन रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिक जिल्ह्यात लसीकरणाने मोठे उद्दीष्ट साध्य केले. मात्र, हे लसीकरण नेमके कशा पद्धतीने झाले याच्या एकेक सुरूस कथा आता बाहेर येत आहेत. लसीकरणासाठी अनेक ठिकाणी शाळेत केंद्र थाटण्यात आले होते. शिक्षकांना या कामी नियुक्त करण्यात आले होते. मालेगावमधल्या संगमेश्वर वॉर्डात जुलै महिन्यात लसीकरण मोहीम राबवली. यात 2 जुलै 2021 रोजी कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांनी 13 जणांना कोविड लस न देताच प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून याप्रकरणी दहा शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. आता त्यांची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच 1 जानेवारीपासून त्यांना कामावर रुजू करून घेण्यात आले आहे. त्यांनी चौकशीत सहकार्य करू, निलंबन घ्यावे, असा अर्ज लिहून दिला आहे. त्यानंतर त्यांच्यावरील ही कारवाई मागे घेतल्याचे समजते.
दबावापोटी निर्णय
निलंबित शिक्षकांना मुख्यालय सोडू नये, अशी तंबी देण्यात आली होती. त्यांना रोज सकाळी दहा वाजता शिक्षणट मंडळ कार्यालयात हजेरी लावून स्वाक्षरी करावी लागेल. निलंबन काळात शिक्षकांना नियमाप्रमाणे निर्वाह भत्ता मिळेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, याप्रकरणी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. उर्दू शिक्षक संघाने महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांना निवेदन देत शिक्षकांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी केली होती. त्यांनी उपायुक्त आणि प्रशासनाधिकारी यांनाही निवेदन देत ही मागणी केली होती. त्यानंतर दबावापोटी हा निर्णय घेतला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नियमांचे पालन नाही
कोरोनाचे वाढलेले रुग्ण पाहता नाशिकमध्ये आता सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. त्यामुळे कसल्याही पार्ट्या होणार नाहीत. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या ही घटवण्यात आली आहे. मात्र, या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शिवाय गेल्या आठ दिवसांत 9 जणांचे मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.
इतर बातम्याः
Property Tax|नाशिकमध्येही मालमत्ता करमाफी होण्याची शक्यता; पालकमंत्री छगन भुजबळांनी काय दिले संकेत?
Malegaon scam| कृषिमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यात 89 कोटींचा अनुदान वाटप घोटाळा