Nashik| मैदानी खेळांची राजधानी म्हणून नाशिकची ओळख कौतुकास्पद, भुजबळांचे गौरवोद्गार; खेलो इंडिया ॲथलेटिक्स केंद्राचे उद्घाटन
नाशिकः नाशिक जिल्ह्याने राज्याला तसेच देशाला उत्तम खेळाडू दिले. त्यामुळे नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी अधोरेखित केले आहे. याचा नाशिककरांना सार्थ अभिमान आहे. अलीकडे नाशिकला मैदानी खेळांची राजधानी म्हणून मिळणारी ओळख कौतुकास्पद असून, हे केवळ खेळाडूंमुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी […]
नाशिकः नाशिक जिल्ह्याने राज्याला तसेच देशाला उत्तम खेळाडू दिले. त्यामुळे नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी अधोरेखित केले आहे. याचा नाशिककरांना सार्थ अभिमान आहे. अलीकडे नाशिकला मैदानी खेळांची राजधानी म्हणून मिळणारी ओळख कौतुकास्पद असून, हे केवळ खेळाडूंमुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. आज विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय खेलो इंडिया ॲथलेटिक्स केंद्राचे उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा उपसंचालक, सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, आंतराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक विजयेंद्र सिंग, शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कारर्थी नरेंद्र छाजेड, तालुका क्रीडा अधिकारी गीता साखरे, क्रीडा अधिकारी महेश पाटील व विद्यार्थी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय छाप
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील बापू नाडकर्णी (क्रिकेट), कविता राऊत (अॅथलेटिक्स), दत्तू भोकनळ (रोईंग), किसन तडवी (अॅथलेटिक्स), मिताली गायकवाड(पॅरास्पोर्टस-धनुर्विद्या), माया सोनवणे (क्रिकेट), विदित गुजराथी (बुद्धीबळ), संजीवनी जाधव, मोनिका आथरे, यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आता अॅथलेटिक्स खेळात प्रसाद अहिरे, ताई बामणे, दुर्गा देवरे, पुनम सोनवणे आदी खेळाडूंनी नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी अधोरेखित केलेले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे यांनी सांगितले.
सहा केंद्राचे प्रस्ताव
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांनी खेलो इंडिया सेंटर अंतर्गत राज्यातील जिल्हानिहाय एक अशा विविध खेळांची एकूण 36 क्रीडा केंद्रे मंजूर केलेली आहेत. यात नाशिक जिल्ह्यातून आपण अॅथलेटिक्स, ज्युदो, तलवारबाजी, खो-खो, मल्लखांब व धनुर्विद्या असे एकूण सहा केंद्राचे प्रस्ताव सादर केले होते. यापैकी अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारला 21 मे 2021 रोजी मान्यता प्राप्त झाली आहे. त्यादृष्टीने आज या सेंटरची अधिकृतरित्या सुरुवात करण्यात झाली असून, उर्वरित पाच क्रीडा प्रकारांच्या सेंटर्सला देखील लवकरच मान्यता मिळून जिल्ह्यात ते सेंटर्स लवकरच सुरू होतील. जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात आली असून खेळाडू व प्रशिक्षक यांची खेलो इंडियाच्या संकेत स्थळावर नोंदणी करण्यात आली आहे. या सेंटरकरीता केंद्र शासनाकडून प्रथम वर्ष 10 लाख रुपये व पुढील तीन प्रती वर्ष पाच लाख रुपये असा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते उपस्थित ॲथलेटिक्स खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
इतर बातम्याः